Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्या‘एनईसी’च्या शिरपेचात मानाचा तुरा

‘एनईसी’च्या शिरपेचात मानाचा तुरा

सातपूर | प्रतिनिधी | Satpur

नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरला (NEC) डायरेक्टोरेट जनरल ऑफ एरॉनॉटीकल क्वालिटी अ‍ॅशुअरन्सने (डीजीएक्यूए) संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्राच्या इलेक्ट्रिकल, पर्यावरणीय, रासायनिक चाचणी आणि यांत्रिक चाचणी सुविधांद्वारे प्रमाणीत करण्याची मान्यता दिली आहे…

- Advertisement -

ही मान्यता 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत तीन वर्षांसाठी आहे. आतापर्यंत केलेल्या अनेक कामगिरीपैकी नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरच्या (Nashik Engineering Cluster) शिरपेचात हा आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे, असे ‘एनईसी’चे चेअरमन विक्रम सारडा (Vikram Sarda) यांनी सांगितले.

उद्योगासाठी उद्योगाद्वारे काम करणारी संस्था म्हणून ओळख असलेल्या नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरने संरक्षण क्षेत्र व उद्योजकांमधील महत्वाची दरी भरून काढण्यासाठी आपल्या तांत्रिक सामर्थ्याचा उपयोग केला आहे.

संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्राच्या अचूक गरजा पूर्ण करण्यासाठी त्याच्या चाचणीसाठीच्या पायाभूत सुविधांमध्ये विकास केला आहे. भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या एरोनॉटिकल क्वालिटी अ‍ॅश्युरन्स महासंचालकांकडून (डीजीएक्यूए) त्याला मान्यता मिळवली असल्याचे सारडा यांनी जाहीर केले.

‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘मेक इन इंडिया’ हे भारताच्या विकासाचे दोन मंत्र आहेत. विशेषतः संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रासाठी ते आवश्यक आहेत, असे सारडा यांनी स्पष्ट केले. भारताच्या संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रासाठी जटील उत्पादनांच्या विकासाच्या संपूर्ण प्रक्रियेत उत्पादनांची चाचणी आणि प्रमाणीकरण हा मोठा अडथळा होता.

तो आता दूर झाला आहे. नाशिक परिसरात संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रात औद्योगिक वाढ सुरू करण्यासाठी संरक्षण क्षेत्रात नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरचे हे पहिले पाऊल आहे. नाशिकला संरक्षण क्षेत्रातील उत्पादनाचे हब बनवण्याच्या दिशेने एक पाऊल आहे, असे सारडा म्हणाले.

नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टर ही पश्चिम भारतातील मोजक्या स्वतंत्र चाचणी प्रयोगशाळांपैकी एक आहे. ‘एनइसी’त आता डीजीक्यूद्वारे मंजूर टेस्टिंग लॅबोरेटरी करण्यासाठी डीजीएक्यूए टीमच्या तांत्रिक ऑडिटच्या अनेक फेर्‍यांना सामोरे जावे लागले. अखेर त्यातून नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टर तावून-सुलाखून निघाल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेंद्र माथूर (Surendra Mathur) यांनी सांगितले.

संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रात काम करणार्‍या उद्योगांना आणि स्टार्टअपना त्यांच्या उत्पादनांची नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरच्या डीजीएक्यूए मान्यताप्राप्त प्रयोगशाळेत चाचणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी मोठा उपयोग होणार असल्याचेही माथूर यांनी नमूद केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या