सत्तासंघर्ष : बंडखोरी, मुख्यमंत्री ते शिवसेना मुख्य नेते...एकनाथ शिंदेंचा खडतर प्रवास

सत्तासंघर्ष : बंडखोरी, मुख्यमंत्री ते शिवसेना मुख्य नेते...एकनाथ शिंदेंचा खडतर प्रवास

नाशिक । फारूक पठाण

देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने काल राज्यातील एकनाथ शिंदे सरकारला मोठा दिलासा दिला, तर दुसरीकडे अनेक ताशेरेदेखील ओढले आहेत. मात्र मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे कायम असल्यामुळे शिंदे गटात उत्साहाचे वातावरण आहे. निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना विरोधकांवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणणार्‍यांना कोर्टाने उत्तर दिले आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या आतापर्यंतच्या रंजक प्रवासाचा थोडक्यात घेतलेला हा आढावा...

महाराष्ट्र राज्यात कधी नव्हे एवढ्या मोठ्या प्रमाणात उलथापालथ जून 2022 च्या काळात झाली. बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेत कोणी बंड करून सेनेच्याच मुख्यमंत्र्यांची खुर्ची खेचू शकतो, याचा कोणी स्वप्नातदेखील विचार केला नसेल. मात्र हा कारनामा सेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी करून दाखवला. त्यामुळेच की काय भारतासह जगभरातील सुमारे 33 देशांनी या घटनेची दखल घेतली होती.

ठाणे व शिवसेना हे समीकरण बाळासाहेबांपासून मजबूत होते. आनंद दिघे हे बाळासाहेबांचे अत्यंत विश्वासू सैनिक होते. मात्र त्यांच्या अकाली निधनाने जी पोकळी निर्माण झाली त्याला काही प्रमाणात एकनाथ शिंदे यांनी भरून काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला, हेही खरे आहे. शिंदे हे रिक्षाचालक होते. मात्र बाळासाहेबांचे विचार व दिघेंची साथ यामुळे ते समाजकारण व राजकराणात सक्रिय झाले व यशस्वीदेखील झाले.

अचानक बंडामुळे चर्चेत

एकनाथ शिंदे हे कट्टर शिवसैनिक व ‘मातोश्री’चे ‘वफादार’ अशी ओळख असलेला नेता अशी होती. मात्र आता ते स्वत: शिवसेनेचे मुख्य नेते आहेत. मागील सुमारे 11 महिन्यांचा त्याचा प्रवास तसा थक्क करणाराच आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत युतीने एकहाती बहुमत मिळवून फडणवीस सरकार पूर्ण पाच वर्षे चालले तर 2019 सालची निवडणूकदेखील भाजप व सेना युतीनेच लढण्यात आली. मात्र 2014 ते 2019 याकाळात भाजप व सेनेत सत्तेत बरोबर असूनही दुरावा वाढत गेला. त्याची अनेक उदाहरणे असली तरी एक घटना मोठी घडली होती. मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना त्यांच्या कार्यालयाबाहेर काही तास वेटिंगवर ठेवले होते. यामुळे ठाकरे मुख्यमंत्र्यांना न भेटता निघून गेले होते, अशी चर्चा त्यावेळी रंगली होती. त्यामुळे दोन्ही पक्षांचे प्रमुख नेते ‘वेळे’ची वाट पाहत होते.

या काळात 2019 ची विधानसभा निवडणूक लागली. त्यात युती म्हणून दोन्ही पक्ष मैदानात आले खरे, पण एकमेकांची ताकद कमी करण्यासाठी पूर्ण शक्ती पणाला लावली होती, असे दिसून आले. याचे उदाहरणे द्यायचे म्हटल्यावर नाशिकमध्येच दोन ठिकाणी याची प्रचिती आली होती. पूर्व मतदारसंघातून विद्यमान आमदार असलेले भाजपचे बाळासाहेब सानप यांना पक्षाने तिकीट नाकारून मनसेनेचे अ‍ॅड. राहुल ढिकले यांना उमेदवारी दिली. तर सानप यांनी पक्षाचे आदेश न मानता ढिकले यांच्यासमोर उभे राहिले होते. त्यावेळी स्वत: खा. संजय राऊत यांनी पंचवटीत येऊन सानप यांना पाठिंबा दिला होता, तर नाशिक पश्चिम मतदारसंघात भाजपच्या अधिकृत उमेदवार असलेल्या सीमा हिरे यांच्यासमोर सेनेचे बंडखोर विलास शिंदे यांनी उमेदवारी करून कडवे आव्हान उभे केले होते.

शिंदे यांच्यासाठी सेनेच्या नेत्यांनी मोठी कसरत केली होती. मात्र दोन्ही ठिकाणी भाजपने बाजी मारली होती. असेच प्रकार सेनेच्या उमेदवारांसमोरही घडले होते, अशी चर्चा होती. एका चर्चेनुसार भाजपच्या 50 च्या जवळपास उमेदवारांसमोर सेनेचे ‘छुपे’ उमेदवार होते, तर सेनेच्या 70 च्या जवळपास उमेदवारांसमोर भाजपचे ‘छुपे’ उमेदवार होते. त्यामुळे पडद्यामागे काय चालू आहे हे स्पष्ट दिसत होते. मात्र दोघांना प्रतीक्षा होती ती निकालाची. निकालही सेनेसाठी ‘बार्गेनिंग’ पॉवर वाढणारे आले. त्यामुळे अडीच वर्षे सेनेला मुख्यमंत्रिपद द्या, अशी मागणी करून उद्धव ठाकरे यांनी भाजपला कोंडीत पकडले. भाजपने त्याला नकार दिल्याने काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत नवीन प्रयोग करून महाविकास आघाडी तयार झाली. तर भारतीय जनता पक्ष विरोधी बाकावर बसला. मात्र शंभरपेक्षा जास्त आमदार निवडून येऊनही आपण विरोधात आहोत हे भाजप नेत्यांचा पचत नव्हते. म्हणून त्यांच्या इशार्‍याने सेनेत कधी नव्हे अशी बंडखोरी झाली. एकनाथ शिंदे यांनी सेनेतील तब्बल 40 आमदार फोडून भाजपसोबत राज्याची सत्ता काबीज केली. यामुळे उद्धव ठाकरे यांच्या जागी मुख्यमंत्री म्हणून शिंदे यांनी शपथ घेतली.

शिंदेंचा प्रवास

विधान परिषदेची निवडणूक झाल्यानंतर शिंदे अचानक नॉट रिचेबल झाले होते. विधानसभेतून ठाणे मग सुरत त्यानंतर गुवाहाटी, तिथून पुढे गोव्यापर्यंत त्यांनी अनेक झाडी, डोंगर आणि हॉटेल पादाक्रांत केले. सुरुवातीला रस्ते नंतर हवाईमार्गे रंजक प्रवास करत शिंदे थेट मुंबईच्या राजभवनावर दाखल झाले. 30 जून 2022 रोजी शिंदे यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली.

20 ते 30 जून या दहा दिवसांत शिंदे यांच्या बंडाने महाराष्ट्राचे राजकीय समीकरण पूर्णपणे बदलून गेले होते. 21 जून 2022 रोजी शिंदे आपल्या समर्थक आमदारांसह गुजरातच्या सुरतमध्ये दाखल झाले. या ठिकाणी त्यांनी शक्तिप्रदर्शनही केले होते. त्यानंतर हे आमदार सुरतहून गुवाहाटीला गेले. तर दुसरीकडे शिंदेंविरुद्ध कारवाईचा इशारा देत शिवसेनेने अजय चौधरी यांना गटनेतेपदी नियुक्त केले. तर सुनील प्रभू यांची नियुक्ती प्रतोद म्हणून करण्यात आली. त्याला प्रत्युत्तर म्हणून शिंदे यांनी भरत गोगावले यांची प्रतोदपदी नियुक्ती केली.

शिंदेंच्या बाजूने 40 आमदार गुवाहाटीत जमले होते. एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, असा ठराव आमदारांनी करून एकनाथ शिंदे यांना त्यांच्याबाबत सर्वाधिकार दिले. बंडखोर आमदार शिंदे यांच्या बाजूने ठाम झाले होते. गुवाहाटीतून निघण्याआधी 28 जून 2022 रोजी एकनाथ शिंदेंसह सर्व आमदारांनी गुवाहाटीत कामाख्या देवीचे दर्शन घेतले होते, तर गुवाहाटीवरून गोव्याकडे त्यांचे प्रयाण झाले. तर 30 जून रोजी समर्थक आमदारांना गोव्यातच ठेवून एकनाथ शिंदे प्रमुख आमदारांसह मुंबईकडे रवाना झाले.

30 जून रोजी सकाळी 11 वाजता बहुमत चाचणी होणे अपेक्षित होते. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यामुळे बहुमत चाचणीऐवजी थेट देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदे यांचा शपथविधी होणार, हे स्पष्ट झाले. राजभवनवर मोठा ट्विस्ट या घटनाक्रमात पाहायला मिळाला होता. मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे यांची वर्णी लागेल, अशी घोषणा या ठिकाणी फडणवीसांनी केली. तसेच स्वतः सत्तेच्या बाहेर राहणार असल्याचे फडणवीसांनी जाहीर केले. अशाप्रकारे एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाले होते. नंतर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

काय झाडी, काय डोंगार...!

बंडखोरी करून आमदार गुवाहाटीला गेल्यावर सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांचे ‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटील’ हे वक्तव्य प्रचंड व्हायरल झाले होते. त्याची आजही सर्वांना आठवण आहे. एकनाथ शिंदे यांनी या डायलॉगवर तयार झालेले गाणे शहाजी पाटील यांना दाखवून डायलॉग पुन्हा बोलून दाखवण्याची फर्माईश केली होती.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com