Thursday, April 25, 2024
Homeजळगावखरंच, आम्ही जळगाव जिल्हावासीय इतके ना-लायक आहोत?

खरंच, आम्ही जळगाव जिल्हावासीय इतके ना-लायक आहोत?

हेमंत अलोने

जळगाव । jalgaon

- Advertisement -

ज्या लायकीची जनता, त्याच लायकीचे त्यांचे लोकप्रतिनिधी अशा आशयाचे एक इंग्रजी सुभाषित आहे. जळगाव जिल्ह्याच्या सध्याच्या राजकारणाचा पोत पाहता, अतिशय खालच्या पातळीवर होत असलेले आरोप प्रत्यारोप पाहता या जबाबदार नेत्यांना निवडून देणारे आम्ही जळगाव जिल्हावासीय इतके ना-लायक आहोत का, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.

जिल्ह्याचे नेते आ. एकनाथराव खडसे व ज्येष्ठ मंत्री गिरीश महाजन यांच्यातील वाद उभ्या महाराष्ट्राला नवीन नाही. या आधीही फाईल, सीडी, ईडी अशी भाषा उभय नेत्यांकडून झाली आहे. या दोघांमध्ये कोण गुरु, कोण चेला?, कोणी कोणाला चितपट केले यात आता सुज्ञ नागरिकांना कोणताही रस उरलेला नाही. वैयक्तिक हेव्या-दाव्यांसाठी एकमेकांवर चिखलफेक करण्याऐवजी हीच ऊर्जा विकासकामांसाठी खर्च केली असती तर जिल्ह्याचे आजचे चित्र निश्चितच बरे दिसले असते. आरोप प्रत्यारोपांशिवाय राजकारण शक्य नाही, पण आपली विधानं एकमेकांना नागडे करणारीच असतील तर आपण कोणती अभिरुची जोपासतोय याचा विचार या लोकप्रतिनिधींनी जरूर केला पाहिजे. एखाद्याच्या मुलाच्या मृत्यूचे राजकारण करण्याइतकी मुडदाफरास मनोवृत्ती आमच्या लोकप्रतिनिधींची झाली आहे का? राजकारणात आपण पेरतो तेच उगवते हे खडसे-महाजन आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घेतले पाहिजे.

आ. खडसेंची आज जिल्ह्याच्या आणि राज्याच्या राजकारणात जी अवस्था आहे ती कधी काय बोलू नये याचे भान हरवल्यामुळेच आहे. अन्यथा मुख्यमंत्री पदाच्या लायक असणार्‍या आ.खडसेंना साध्या आमदारकीसाठी असहायपणे झुरत राहावे लागले नसते. खडसे आक्रमक बोलणारे आहेत पण आक्रमकता म्हणजे समोरच्याचे कपडे काढणे असते का? ना. महाजनांकडे नेतृत्व गुण निश्चितच आहेत त्याशिवाय राजकारणात त्यांनी इतकी मजल मारली नसती. पण ना. महाजनांच्या राजकीय भरारीला खडसेंच्या राजकीय विरोधाची किनारही आहे हे कोण नाकारेल? भाजपाला खडसेंना दूर सारायचे होते, त्यासाठी ना.महाजनांना जिल्ह्यात आणि राज्यात बळ दिले गेले. खडसेंचे खच्चीकरण करायचे असेल तर तूल्यबळ नेता हवा आणि भाजपाला तो ‘स्पार्क’ गिरीश महाजनांमध्ये दिसला.

राजकारणात सोयीसाठी भूमिका ठरतात आणि त्यासाठी माणसं वापरली जातात. बुद्धिबळाच्या पटावरील सामना संपल्यावर राजा असो की प्यादे सारे एकाच डब्ब्यात जातात, हे लक्षात घेतले पाहिजे. राज्यात भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना यांची सत्ता असली तरी भाजपाच्याच हाती निर्णय प्रक्रियेचे सुकाणू आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या ‘गूड बुक’मध्ये असलेल्या गिरीशभाऊंना त्यांच्याच गृह जिल्ह्याचे पालकमंत्री केले गेले नाही. गेल्या सरकारमध्ये त्यांनी नाशिकचे पालकत्व निभावले होते, आता नाशिकसाठीही त्यांचा विचार होऊ नये याचा काय अर्थ काढावा? बाळासाहेबांची शिवसेना वरचढ ठरली की गिरीशभाऊंच्या पंखांना स्वकीयांनीच कात्री लावली?

काल सोमवारी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत राजकीय आखाडाच रंगला. कोण कुठे बसते? व्यासपीठावर की समोर, यावर महत्व ठरत नाही की कोणी खुजाही होत नाही. उलट असे उद्योग करणार्‍यांची छोटी मानसिकता मात्र अधोरेखित होते. आ.खडसेंच्या मुलाच्या मृत्यूबाबत काल ना. महाजनांनी वक्तव्य केले. खडसेंच्या मुलाचा मृत्यू आत्महत्या की खून? असा प्रश्न उपस्थित केला. आपल्याला सर्व माहीत आहे, उगाच बोलायला लावू नका असा इशाराही त्यांनी खडसेंना दिला. मुळात 10 वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेचे आज राजकारण करणे हेच घृणास्पद आहे.

आपल्या राजकारणाची पातळी किती घसरली आहे, हेच यातून दिसून येते. 97-98 साली फर्दापूर रेस्ट हाऊसमध्ये झालेल्या प्रकाराची आपल्याला माहिती आहे, पण मी बोलणार नाही, असे आ. खडसे काल म्हणाले. खडसेंच्या मुलाच्या मृत्यूला 10 वर्ष झालीत तर फर्दापूरच्या कथित चर्चेला दोन तप लोटलेत. इतक्या कालावधीनंतर असे प्रकार उकरून काय साध्य होणार? मुळात फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 92 नुसार एखाद्याला एखाद्या गुन्ह्याबाबत काही माहिती असेल तर पोलीस प्रशासन संबंधित व्यक्तीला नोटीस देऊन माहिती घेऊ शकते. पण प्रभावशाली राजकीय व्यक्तींच्या वाट्याला पोलीस जातील, याची शक्यता कमीच आहे. पण जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून ना. महाजन यांनी आ. खडसेंच्या मुलाच्या मृत्यूबाबत त्यांना असलेली माहिती स्वतःहून पोलिसांना दिली पाहिजे.

त्याचप्रमाणे आ. खडसे यांना 25 वर्षांपूर्वी फर्दापूर रेस्ट हाऊसमध्ये काय प्रकार घडला याची माहिती असेल तर त्यांनीही ती सक्षम यंत्रणेला दिली पाहिजे. मुळात एखाद्या घडलेल्या कथित गुन्ह्यांबाबत माहिती देणे हे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची जबाबदारीच आहे. एखादा गुन्हा माहीत असूनही दडवणे अधिक गंभीर आहे. तेव्हा हवेत वार करण्यापेक्षा उचित ठिकाणी तक्रार पोहोचवणे महत्वाचे आहे. ना. महाजन आणि आ. खडसे ज्येष्ठ आहेत, जबाबदार आहेत. त्यांच्याकडून अशा थील्लर आरोपांची अपेक्षा नाहीच, आरोप करताना त्यांचे पुरावेही देऊन दूध का दूध… करण्याचे धारिष्ट दोघांनीही दाखवले पाहिजे.

जिल्ह्याचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, ते सोडविले तरच इतिहास नोंद घेईल. एकमेकांची जिरवण्यात आपल्या जिल्ह्याच्या विकासालाच नख लावले जात असेल तर जिल्हावासीय कधीही माफ करणार नाहीत. जिल्ह्याच्या सध्याच्या गलिच्छ राजकीय वातावरणात या जिल्ह्यावर अनेक वर्ष प्रभाव असणार्‍या माजी मंत्री सुरेशदादा जैन यांची आठवण अनेकांना येते.

सुरेशदादांच्या हजार चुका असतील पण राजकीय घाण चिवडण्याचे उद्योग त्यांनी कधी केले नाहीत. एकमेकांवर कमरेखालचे वार करून गिरीशभाऊ, नाथाभाऊ यांनी स्वतःची उंची कमी करण्याचा नादानपणा करू नये, एवढीच अपेक्षा आहे. गिरीशभाऊ, नाथाभाऊंसारखे लोकप्रतिनिधी निवडून जळगाववासीय ना-लायक ठरत असतील तर हेच मतदार आपली चूक दुरुस्त करतील, याचे भान या नेत्यांनी ठेवले पाहिजे.

- Advertisment -

ताज्या बातम्या