दहा वर्षांतील बांधकामांची उलटतपासणी

दहा वर्षांतील बांधकामांची उलटतपासणी

नाशिक । प्रतिनिधी Nashik

मागील काही वर्षांत नाशिक शहराचा ( Nashik City ) झपाट्याने विकास झाला. तर शहरातील विविध भागात हजारो नवी बांधकामे उभी राहिली. मात्र महापालिकेच्या घरपट्टीत नवीन मिळकतींची नोंद झालेली नसल्याने गत दहा वर्षातील सर्व बांधकामांची उलटतपासणी ( Re-inspection of constructions )करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त कैलास जाधव ( Municipal Commissioner Kailas Jadhav ) यांनी घेतला आहे.

या बांधकामांना देण्यात आलेले सर्व प्रकारचे पूर्णत्वाचे दाखले कर विभागाकडे हस्तांतरीत करण्याचे आदेश त्यांनी नगररचना विभागाच्या सहाय्यक संचालकांना दिले आहे. पूर्णत्वाचे दाखले प्राप्त झाल्यानंतर संबंधित मिळकतधारकांची घरपट्टीत नोंद केली किंवा नाही याची विभागीय अधिकार्‍यांमार्फत तपासणी करून संबंधित मिळकतींवर पूर्णत्वाच्या दाखल्यापासून करआकारणी करण्याचे निर्देश आयुक्तांनी कर वसुली विभागाला दिले आहेत.

जीएसटी करापोटी शासनाकडून मिळणार्‍या अनुदानाखेरीज घरपट्टी हा महापालिकेच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे. शहरातील सुमारे सव्वाचार लाख मिळकतींची घरपट्टी सदरी नोंद आहे. परंतु शहरात सुमारे सहा लाखांहून अधिक मिळकती असण्याचा अंदाज आहे. मुंबई, पुण्यापाठोपाठ नाशिक शहरात वेगाने नवी बांधकामे उभी राहत आहेत. गेल्या दहा वर्षांत शहरात अनेक नवीन वसाहती निर्माण झाल्या आहेत.

या वसाहतींमध्ये मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी महापालिकेला निधी खर्च करावा लागत आहे. इमारतींचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर नगररचना विभागाकडून संबंधित इमारतीला बांधकाम पूर्णत्वाचा दाखला दिला जातो. त्या दिनांकापासून संबंधित मिळकतीवर घरपट्टी कराची आकारणी केली जाणे कायद्याने बंधनकारक आहे. परंतु गेल्या दहा वर्षांत नगररचना विभागाकडून जितक्या प्रमाणात इमारत बांधकाम पूर्णत्वाचे दाखले दिले गेले त्या तुलनेत घरपट्टी सदरी इमारतींची नोंद झाली नाही. त्यामुळे महापालिकेला घरपट्टीतून अपेक्षित उत्पन्नाचे उद्दिष्ट गाठता आलेले नाही.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com