प्रमाणपत्रांची पुनर्तपासणी

जिल्हा परिषद प्रशासनाचे विभागांना निर्देश
प्रमाणपत्रांची पुनर्तपासणी

नाशिक । प्रतिनिधी Nashik

गेल्या वर्षी पोलीस दलातील कर्मचार्‍यांनी सोयीस्कर ठिकाणी बदली करवून घेण्यासाठी खोटी आरोग्य प्रमाणपत्रे सादर करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला होता. या प्रकरणाच्या धर्तीवर असेच प्रमाणपत्र सादर करणारी प्रकरणे उघडकीला यावीत यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने या प्रमाणपत्रांच्या पुनर्तपासणीचे निर्देश यंत्रणेला दिले होते.

या निर्देशांनंतर सामान्य प्रशासन विभागाकडून 22 कर्मचार्‍यांची प्रमाणपत्रे सादर करण्यात आली असली तरीही इतर विभागांच्या पुढाकाराबाबत उदासीनता दिसून येत आहे. याशिवाय हे प्रमाणपत्र देणारे शासकीय रुग्णालयेच या प्रमाणपत्रांची पडताळणी करणार असेल तर तपासणीतील पारदर्शकतेसमोर प्रश्नचिन्ह उभे राहणार आहे.

काही महिन्यांपूर्वी खोटी आरोग्य प्रमाणपत्रे जिल्हा रुग्णालयातून दिली गेल्याचा प्रकार राज्यभरात चर्चेचा विषय ठरला होता. या प्रकरणी शासनाने चौकशी समिती गठित करून कारवाईचा इशाराही दिला होता. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी जिल्हा परिषदेतील ज्या कर्मचार्‍यांनी गत दोन वर्षांत बदलीसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केली आहेत त्यांच्या कागदत्रांची पुनर्पडताळणी करण्याचे निर्देश दिले होते.

यानंतर बनसोड यांची बदली झाल्यामुळे प्रमाणपत्रांच्या सत्यतेबाबत धाकधूक असणार्‍या कर्मचार्‍यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला होता. मात्र, गत महिन्यात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी या प्रकरणी सर्व विभागांना र्निर्देश देत प्रमाणपत्र पडताळणी करण्यास सांगितले होते. यामुळे जिल्हा परिषदेच्या विविध विभागांना वैद्यकीय प्रमाणपत्रांच्या आधारे बदली करवून घेणार्‍या कर्मचार्‍यांची कागदपत्रे पडताळणीसाठी पुन्हा मागवावी लागणार आहेत. या निर्देशानंतर सर्वच विभागांकडून तातडीने प्रतिसाद मिळणे अपेक्षित असताना मात्र आतापर्यंत सामान्य प्रशासन विभागाकडून 22 प्रकरणे पडताळणीसाठी सादर करण्यात आली आहेत. इतर विभागांची उदासीनता चर्चेचा विषय झाला आहे.

पारदर्शकतेचे काय?

बदलीच्या कारणासाठी ज्या कर्मचार्‍यांना जिल्हा रुग्णालयाने या अगोदर आरोग्य प्रमाणपत्र दिली आहेत, त्याच जिल्हा रुग्णालयाकडे आता ही प्रमाणपत्रे पुनर्पडताळणीसाठी पाठवली जाणार आहेत. प्रमाणपत्रे देणारी संस्थाच या प्रकरणी अगोदरच संशयाच्या भोवर्‍यात सापडली असताना पुनर्पडताळणीत कितपत पारदर्शकता सांभाळण्यास ही संस्था सक्षम ठरेल, याबाबत मात्र अनेकांच्या मनात शंका आहे. याशिवाय ज्या विभागांकडून ही प्रमाणपत्रे सादर करण्यास अद्याप टाळाटाळ केली जात आहे त्यांना काही अल्टिमेटम मिळणार की जे प्रामाणिकपणे कागदपत्र सादर करणार तेच या जात्यात भरडले जाणार? असाही सवाल कर्मचार्‍यांकडून उपस्थित केला जात आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com