
मुंबई | Mumbai
सतत वाढत चाललेल्या महागाईमुळे रिझर्व्ह बँकेने (RBI) गुरुवारी पुन्हा एकदा रेपो दरात (RBI Repo Rate Hike) वाढ करण्याची घोषणा केली आहे.
आता रेपो दरात ५० बेसिस पॉईंट्सची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे रेपो दर ५.४० टक्के झाला आहे.
आरबीआयच्या या निर्णयानंतर सरकारी ते खाजगी बँका आणि हाउसिंग फायनान्स कंपन्या गृहकर्जाचे व्याजदर वाढणार असून, कर्जदारांचा हप्ता वाढणार आहे. याआधीही ४ मे आणि ८ जून २०२२ रोजी आरबीआयने रेपो रेटमध्ये एकूण ९०बेसिस पॉईंटची वाढ केली होती.
त्यानंतर बँक ते हाऊसिंग फायनान्स कंपन्यांनी गृहकर्जावरील व्याजदर ०.९० टक्क्यांवरून १.१५ टक्क्यांपर्यंत वाढवले होते. त्यानंतर आता आरबीआयनेदेखील रेपो दरात पुन्हा वाढीची घोषणा केली आहे. त्यामुळे गृहकर्जासह सर्वेच कर्जांचे हप्ते वाढणार आहे.
रेपो रेट म्हणजे नेमकं काय?
रेपो रेटच्या आधारावर आरबीआय बँकांना कर्ज देत असते. त्यानंतर बँका हे कर्ज ग्राहकांना देत असतात. रेपो रेट कमी असल्याचा अर्थ असा आहे की बँकांकडून लोकांना मिळणारे कर्ज स्वस्तात मिळू शकते.