रावेर : दंगलीतील नुकसान भरपाई संबंधित परिसरातून वसुल होणार
मुख्य बातम्या

रावेर : दंगलीतील नुकसान भरपाई संबंधित परिसरातून वसुल होणार

राज्यातील पहिलाच प्रयोग

Rajendra Patil

जळगाव | प्रतिनिधी Jalgaon

रावेर शहरात करोनाच्या पार्श्‍वभूमीवरील लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी २२ मार्च रोजी झालेल्या दंगलीतील नुकसान भरपाई नगरपालिकेमार्फत दंगलीच्या संबंधित भागातील नागरिकांकडून वसुल करण्यात यावा.

नगरपालिकेने घरपट्टी, पाणीपट्टी अशा स्वरुपातून साधारणत: साडेसहा कोटी रुपये वसुल करावे. या रक्कमेतून दंगलीतील मयताचे वारस, नुकसानग्रस्त व्यक्ती, विविध विभागांना मदत देण्यात येईल. याबाबत पोलीस प्रशासनाने जिल्हाधिकार्‍यांना अहवाल सादर केला आहे. त्यानंतर पुढील निर्णय जिल्हाधिकारी घेतील.

हा प्रस्ताव राज्यातील पहिला असावा, अशी शक्यता अप्पर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांनी बुधवारी दुपारी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.

रावेर शहरात ७४ वर्षात धार्मिक तेढ निर्माण होऊन दोन्ही गटात ४२ दंगे झाले आहेत. अशा दंगलींमुळे संबंधित भागात जिवित अथवा वित्तहानी मोठ्या प्रमाणात होते. दंगलीत काही समाजकंटक शासकीय आणि पर्यायाने जनतेच्या सार्वजनिमिक मालमत्तेची हानी करतात. त्यांच्यावर वचक निर्माण होणे गरजेचे आहे. तसेच अशा दंगली होऊ नये, म्हणून त्या भागातील नागरिकांनी देखील खबरदारी घेणे गरजेचे आहे.

दंगल होऊ नये किंवा दंगल रोखण्याचे कर्तव्य सर्व नागरिकांचे असते. दंगलीतील संबंधित भागातील नागरिकांकडून नुकसान भरपाईची रक्कम विभागून वसुल करण्याचा कायदा आहे. या कायद्याची अंमलबजावणी जिल्हा पोलीस प्रशासन करीत आहे.

रावेर शहरात २२ मार्च रोजी जमावाने दंगलीत दगडफेक करीत काही वाहने जाळली आहेत. यशवंत काशिनाथ मराठेे यांना ठार करुन त्यांचे घर पेटवून दिले. यात संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झाले. तसेच शेख जावेद शेख सलीम (रा.रसलपूर) आणि नीलेश भागवत जगताप यांच्यावर शस्त्राने प्राणघातक हल्ला करुन त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न झाला आहे.

एमपीडीए अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव

याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात सात गुन्हे दाखल असून यात ३७७ आरोपी आहेत. यातील काही जणांविरुद्ध एमपीडीए कायद्याप्रमाणे कार्यवाही करण्याचा प्रस्ताव देखील आहे. दंगलीत वापरलेले दगड, विटा संबंधित नागरिकांनी त्यांच्या घराच्या छतावर ठेवल्या होत्या, असे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. संबंधितांच्या घरावरील दगड, विटा, बाटल्यांचा शोध पोलिसांनी ड्रोनच्या सहाय्याने घेतला आहे.

रावेर नगरपालिका हद्दीतील दंगलग्रस्त परिसर नागझिरी, रसलपूर नाका, लेंडीपुरा, कोतवालवाडा, चावडी चौक, शिवाजी चौक, भोईवाडा, संभाजीनगर, बंडू चौक, खाटीकवाडा, मन्यारवाडा, इमामवाडा, पंचशिल चौक, गांधी चौक, थळभाग, पाराचा गणपती, महात्मा फुले चौक, आठवडे बाजार या क्षेत्रास अशांत क्षेत्र घोषीत केल्यानंतर महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम ५१ (३) प्रमाणे ठरवलेली भरपाई रक्कम रावेर नगरपालिकेकडून वसूल करण्याबाबत आदेश देण्यात यावे, यासंदर्भातील अहवाल पोलीस प्रशासनाने तयार करुन तो जिल्हाधिकार्‍यांकडे सादर केला आहे.

रावेरात २२ मार्च रोजी झालेल्या दंगलीच्या कालावधीत जिल्हा पोलीस दलास कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी बंदोबस्ताकरिताचा खर्च सहा कोटी १४ लाख ९२ हजार ५९ रुपये, स्थानिक नागरिकांच्या मालमत्तेची जाळपोळ, तोडफोड व जिवित हानी झाली आहे. यातील पंचनाम्यानुसारची रक्कम पाच लाख २१ हजार रुपये, नगरपालिकेचे झालेले नुकसान व दंगल वस्थापनासंदर्भातील खर्च ७७ हजार रुपये आणि वीज महावितरण कंपनीचे एक हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com