रासाका थांबविणार ऊस उत्पादकांची परवड

दसर्‍याच्या मुहूर्तावर गळीत हंगामाची चिमणी पेटणार
रासाका थांबविणार ऊस उत्पादकांची परवड
USER

नाशिक । सोमनाथ ताकवाले Nashik

सहकार तत्वावर चालणार्‍या कादवा कारखान्यानंतर स्व.काकासाहेब बनकर सहकारी पतसंस्थेने चालविण्यास घेतलेला रानवड साखर कारखाना ( RASAKA ) हा जिल्ह्यातील दुसरा सहकारी संस्थेच्या माध्यमातील कारखाना ठरणार आहे. रासाका सुरू झाल्यानंतर गोदाकाठ परिसरातील 35 ते 40 गावातील ऊस उत्पादकांची परवड दूर होऊन त्यांच्या विकासाला गती प्राप्त होणार आहे, असा ठाम विश्वास आमदार दिलीप बनकर ( MLA Dilip Bankar ) यांनी दै. देशदूतशी बोलताना व्यक्त केला आहे.

सहकारातून समृद्धीकडे या तत्वावर देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांंनी जी राजकीय वाटचाल केलेली आहे त्यांंच्यासमोर आदर्श म्हणून असलेल्यांपैकी तालुक्यातील सहकार क्षेत्रातील कर्मवीरही आहेत. निफाड तालुक्यातील कर्मवीर काकासाहेब वाघ, दुलाजीनाना पाटील , काकासाहेब मोगल, तात्यासाहेब बोरस्ते , काकासाहेब बनकर यांनी सहकारातून विकास घडविलेला होता. रानवड साखर कारखाना सहकारातून उभा राहिलेला होता. हा कारखाना काकासाहेब वाघ यांच्या त्यागाचे प्रतिक होते. तो बंद पडल्याची सल तालुक्याला होती. कारखाना सुरू झाला पाहिजे, ही जनतेची इच्छा होती. त्या इच्छेचे पाईक म्हणून बनकर पतसंस्थेच्या माध्यमातून कारखाना सुरू करण्यात येत आहे, असे आ.बनकर म्हणाले.

रानवड साखर कारखाना हा देशातील एकमेव असा कारखाना ठरणार आहे, जो एका पतसंस्थेने चालविण्यास घेत उर्जितावस्थेत आणण्याचे प्रयत्न केले आहे. गत विधानसभा निवडणूक प्रचार कालावधीत आपण कारखाना सुरू करू, असे आश्वासन जनतेला दिले होते, ही आठवण करून देत आ.बनकर म्हणाले की, आमदार झाल्यानंतर साहजिकच शासन दरबारी पाठपुरावा करत रासाकाची निविदा काढून तो पतसंस्थेच्या माध्यमातून भाडेतत्त्वावर घेण्यास पाठपुरावा केला. त्यात यश आल्याचे आ. बनकर म्हणाले.

कारखान्याची उत्पादन क्षमता 12.5 मेट्रीक टन एवढीच आहे. ती दुप्पट करण्यात येणार आहे. गाळप क्षमता 500 ते 600 मेट्रीक टन करणार आहे. तसेच इथॅनॉल 25 हजार मेट्रीक टन करून ते आगामी काळात सुमारे 60 मेट्रीक टनापर्यंत नेण्याचे ध्येय समोर असल्याचे आ. बनकर म्हणाले. त्याचबरोबर

साखर उत्पादन कमी करून डिस्टलिरी उत्पादन वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. तसेच इथेनॉलचा वापर इंधनात वाढला असल्याने इथेनॉलचे उत्पादन वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे कारखाना सुरू झाल्यानंतर मजूर, शेतकरी आणि कामगारांची परवड दूर होणार आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे गोदाकाठ परिसरातील शेतकर्‍यांना इतर कारखान्यांना ऊस देण्याची जी वणवण करावी लागत होती, ती दूर होऊन त्यांचा ऊस रानवड कारखान्यात गाळपासाठी रवाना होईल, असे आ.बनकर म्हणाले.

सद्यस्थितीत रासाका परिसरातील जागेचे सपाटीकरण, मशिनरीची दुरुस्ती, रस्त्यांची दुरुस्ती, वीज, पाणी आदी सुविधा ही सर्व कामे केली गेली आहे. दसर्‍याच्या मुहूर्तावर कारखान्याचा गळीत हंगाम करण्याचा चंग बांधल्याने त्याचाच एक भाग म्हणून नुकतीच साखर आयुक्त गायकवाड यांनी रासाका कार्यस्थळाला भेट देत पाहणी केली आहे.

शेतकर्‍यांच्या आशा पल्लवित

लॉकडाऊनचा फटका रानवड साखर कारखाना सुरू करण्यास लॉकडाऊन अडसर ठरले. मात्र, आता हंगामाची तयारी पूर्ण झाल्याने तसेच ऊस नोंदणी, कारखाना यंत्रणेची दुरूस्ती, तांत्रिक प्रात्यक्षिके होऊन कारखान्याची सुरूवात करण्यासाठी नियोजन कसे झाले आहे, याची पाहणी राज्याच्या साखर आयुक्तांनी नुकतीच केली आहे. त्याचबरोबर परिसरातील रस्ते, साठवण व्यवस्था आणि इतर मूलभूत सुविधांची पुर्तता करण्यात आलेली आहे. त्यामुळे गोदाकाठ गावांसह इतर तालुक्यातील ऊस उत्पादकांंच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com