
नवी दिल्ली | New Delhi
कर्नाटकचे (Karnataka) नवे मुख्यमंत्री (CM) कोण होणार याबाबत काँग्रेसमध्ये (Congress) अजूनही चर्चा सुरु आहे. सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार हे मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार आहेत. या दोघांमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसण्यासाठी रेस सुरु असून कॉंग्रेस हायकमांडने मुख्यमंत्रीपदासाठी सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब केल्याची माहिती समोर आली आहे. अशातच आता या विषयावर काँग्रेस नेते आणि कनार्टकचे प्रभारी रणदीप सुरजेवाला (Randeep Surjewala) यांनी प्रतिक्रिया दिली आहे...
सुरजेवाला म्हणाले की, सध्या पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांच्यासोबत (मुख्यमंत्रिपदाबाबत) चर्चा सुरु आहे. काँग्रेस जेव्हा निर्णय घेईल तेव्हा आम्ही तुम्हाला कळवू. येत्या ४८-७२ तासांत कर्नाटकात नवे मंत्रिमंडळ असेल. असे त्यांनी म्हटले आहे. तसेच भाजपावरही त्यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, "भाजपाचा या निवडणुकीत पराभव झाला आहे. आता ते वैफल्यग्रस्त अवस्थेतून विविध खोट्या बातम्या पसरवू लागले आहेत. त्याकडे मुळीच लक्ष देऊ नका." असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, आज सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार (D.K.Shivakumar) यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची भेट घेतल्यानंतर कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची वेगवेगळी भेट घेतली. सोनिया गांधी यांच्या १० जनपथ या ठिकाणी असलेल्या निवासस्थानी ही भेट झाली. या भेटीत दोन्ही नेत्यांची राहुल गांधींसोबत सकारात्मक चर्चा झाल्याचे समजते आहे. यावेळी सिद्धरामय्यांनी सुमारे ३० मिनिटे तर डी. के. शिवकुमार यांनी तासभर राहुल गांधी यांच्याशी चर्चा केल्याचे बोलले जात आहे.