
दिल्ली | Delhi
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांचा राजीनामा (Resignation) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केला आहे. याबाबतची माहिती राष्ट्रपती भवनाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाल्याने, त्यांच्या जागी नवीन राज्यपाल येणार आहेत. रमेश बैंस राज्याचे नवीन राज्यपाल म्हणून पदभार स्विकारणार आहेत, मात्र ते कधीपासून पदभार स्विकारणार याची माहिती समोर आलेली नाही.
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्री फुले यांच्याबद्दल वादग्रस्त विधानं केल्यामुळे भगतसिंह कोश्यारी यांच्या विरोधात तीव्र रोष व्यक्त करण्यात आला होता. त्याचबरोबर "कधी कधी मी महाराष्ट्रातल्या लोकांना सांगत असतो की महाराष्ट्रात खासकरून मुंबई आणि ठाण्यातून गुजराथी समाजाचे आणि राजस्थानी समाजाचे लोक निघून गेले तर तुमच्याकडे कुठले पैसे उरणारच नाहीत. मुंबईला जे आर्थिक राजधानी म्हटलं जातं ते म्हटलंही जाणार नाही", असं विधान त्यांनी केलं होतं.
राज्यपालांकडून केल्या गेलेल्या विधानांवरून महाविकास आघाडीने राज्यपालांविरोधात मोर्चाही काढला होता. संभाजीराजे छत्रपती, उदयनराजे भोसले यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. संभाजीराजे छत्रपती यांनी पंतप्रधान, राष्ट्रपती, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना पत्र लिहून भगतसिंह कोश्यारी यांना पदावरून हटवण्याची मागणी केली होती आणि सातत्यानं विरोधकांकडून ही मागणी केली जात होती.