राज्यसभा निवडणूक : छोटे पक्ष, अपक्षांवर भिस्त

शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच
राज्यसभा निवडणूक : छोटे पक्ष, अपक्षांवर भिस्त

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

राज्यसभेच्या सहाव्या जागेवरील उमेदवार निवडून ( Rajyasabha Election ) आणण्यासाठी आघाडी आणि भाजपकडे पुरेशी मते नसल्याने या दोघांची भिस्त छोटे पक्ष आणि अपक्ष आमदारांवर ( MLA's) आहे. त्यामुळे या निर्णायक मतांना आपल्या बाजूने खेचण्यासाठी शिवसेना ( Shivsena ) आणि भाजपमध्ये ( BJP )जोरदार रस्सीखेच सुरू आहे. आघाडी सरकारच्या गेल्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात प्रथमच छोटे पक्ष आणि अपक्षांचे महत्व वाढल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे.

राज्यसभेच्या सहा जागांसाठी येत्या 10 जूनला मतदान होत आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपचे दोन, शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचा प्रत्येकी एक उमेदवार सहजपणे निवडून येणार आहे. मात्र, अतिरिक्त उमेदवार निवडून आणण्यासाठी शिवसेना आणि भाजपकडे पुरेशी मते नाहीत. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीत रंग भरला आहे. छोटे पक्ष आणि अपक्षांना आपल्या बाजूने वळविण्यासाठी आघाडी आणि भाजपकडून रणनीती आखली जात आहे.

भाजपला आपला तिसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी 14 अतिरिक्त मतांची गरज आहे. या मतांची जुळवाजुळव करण्याची जबाबदारी भाजपने माजी मंत्री गिरीश महाजन, आशिष शेलार आणि आमदार प्रसाद लाड यांच्यावर सोपवली आहे. मित्र पक्ष आणि अपक्ष आमदारांच्या मदतीने भाजपच्या मतांची बेरीज 112 इतके होते. त्यामुळे अतिरिक्त मतांची व्यवस्था कशी करायची यावर चर्चा करण्यासाठी शनिवारी भाजपच्या महत्वाच्या नेत्यांची बैठक शनिवारी विधानभवनात पार पडली. या बैठकीला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, अशिष शेलार, प्रसाद लाड, भाजपचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय आदी उपस्थित होते.

दरम्यान,राज्यसभा निवडणुकीच्या संदर्भात छोट्या पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट करायला सुरुवात केली आहे.बहुजन विकास आघाडीचे नेते आमदार हितेंद्र ठाकूर यांनी आपल्याला कोणताही पक्ष अस्पृश्य नसल्याचे सांगत आपण तूर्त आघाडीसोबत असलो तरी राज्यसभा निवडणुकीत भाजपसोबत जाऊ शकतो, असे संकेत दिले आहेत. ठाकूर यांच्या आघाडीकडे 3 मते आहेत. त्यामुळे या निवडणुकीत त्यांच्या पक्षाची भूमिका महत्त्वाची आहे. तर काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी हितेंद्र ठाकूर हे राज्यसभा निवडणुकीत आघाडी सरकारचे समर्थन करतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.

अखिलेश यादव यांच्याशी चर्चा करणार : आझमी

विधानसभेत समाजवादी पक्ष आणि एमआयएमचे प्रत्येकी दोन आमदार आहेत. यापैकी समाजवादी पक्ष आघाडीसोबत आहे. मात्र राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाचे आमदार अबू असीम आझमी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून काही मुद्द्यांचा खुलासा मागवला आहे. त्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांच्या उत्तराची प्रतीक्षा करत असून राज्यसभा निवडणुकीत काय भूमिका घ्यायची याचा निर्णय आम्ही पक्षाचे नेते अखिलेश यादव यांच्याशी चर्चा करून घेऊ, असेही आझमी यांनी स्पष्ट केले.

एमआयएमचा 6 जूनला निर्णय : जलील

राज्यसभेच्या निवडणुकीतील मतदानाबाबत येत्या 6 जून रोजी निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती एमआयएमचे खासदार इमतियाज जलील यांनी दिली. परवा, सोमवारी नांदेडमध्ये पक्षप्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या उपस्थितीत सभा होणार आहे. या सभेच्या दरम्यान पक्षप्रमुख निर्णय देतील. तथापि आम्ही शिवसेना आणि भाजपला कदापि मतदान करणार नाही, असेही जलील यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेना ( MNS )आणि माकपने अजून आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. विधानसभेत या पक्षाचा प्रत्येकी एक सदस्य आहे. आघाडीवरील विश्वासदर्शक ठरवाच्यावेळी हे दोन्ही पक्ष तटस्थ होते. यावेळी त्यांची भूमिका गुलदस्त्यात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com