Wednesday, May 8, 2024
Homeक्रीडाराजस्थान रॉयल्सची विजयी सलामी

राजस्थान रॉयल्सची विजयी सलामी

शारजा । वृत्तसंस्था

गतविजेत्या मुंबई इंडियन्सला पराभूत करुन आयपीएलच्या तेराव्या हंगामाची दणक्यात सुरुवात करणार्‍या चेन्नई सुपरकिंग्जचे विमान दुसर्‍याच सामन्यात जमिनीवर आले.

- Advertisement -

शारजा येथे झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपरकिंग्जवर 16 धावांनी मात केली. राजस्थानने विजयासाठी दिलेले 217 धावांचे आव्हान चेन्नईला पेलवलें नाही. 20 षटकांत चेन्नईचा संघ 200 धावांपर्यंतच मजल मारु शकला.

वॉटसन आणि डु-प्लेसिस या जोडीने डावाची सुरुवात चांगली केली होती. परंतू वॉटसन माघारी परतल्यानंतर चेन्नईचा एकही फलंदाज मोठी भागीदारी करु शकला नाही. फा डु-प्लेसिसने एक बाजू लावून धरत फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला. परंतू दुसर्‍या बाजूने त्याला इतर फलंदाजांकडून योग्य साथ न मिळाल्यामुळे चेन्नईचे प्रयत्न तोकडेच पडले. डु-प्लेसिसने 72 धावा केल्या. राजस्थानकडून राहुल तेवतियाने 3, आर्चर-गोपाळ आणि करन या जोडीने प्रत्येकी 1-1 बळी घेतला.

त्याआधी, संजू सॅमसन आणि कर्णधार स्टिव्ह स्मिथ यांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने तेराव्या हंगामात आपला पहिला सामना खेळताना 216 धावांचा डोंगर उभा केला. संजू सॅमसन आणि कर्णधार स्टिव्ह स्मिथ यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे राजस्थानचा संघ वरचढ दिसत होता.

परंतू सॅमसन माघारी परतल्यानंतर राजस्थानच्या मधल्या फळीतल्या फलंदाजांनी पुन्हा एकदा निराशा केली. परंतू अखेरच्या षटकांत तळातल्या फलंदाजांनी केलेल्या फटकेबाजीमुळे राजस्थानने 200 धावांचा टप्पा ओलांडला. सॅमसनने 32 चेंडूत 1 चौकार आणि 9 षटकारांसह 74 धावा केल्या. स्मिथनेही 69 धावा करत कर्णधारपदाची जबाबदारी निभावली.

नाणेफेक जिंकत चेन्नईचा कर्णधार धोनीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पदार्पण करणार्‍या मुंबईकर यशस्वी जैस्वालला स्वस्तात माघारी धाडत चेन्नईने चांगली सुरुवात केली. मात्र यानंतर मैदानावर आलेल्या संजू सॅमसनने स्टिव्ह स्मिथच्या साथीने चेन्नईच्या गोलंदाजीची धुलाई केली.

दुसर्‍या विकेटसाठी शतकी भागीदारी करत दोन्ही फलंदाजांनी राजस्थानला सुस्थितीत आणलं. सॅमसनने 19 चेंडूत आपलं अर्धशतक झळकावलं. विशेषकरुन पियुष चावलावर दोन्ही फलंदाजांनी हल्लाबोल केला. एन्गिडीने सॅमसनला बाद करुन राजस्थानची जोडी फोडली आणि राजस्थानच्या डावाला गळती लागली.

मधल्या फळीत डेव्हिड मिलर, रॉबिन उथप्पा, राहुल तेवतिया, रियान पराग हे फलंदाज झटपट माघारी परतले. अखेरच्या षटकांत स्टिव्ह स्मिथही मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात बाद झाला. त्याने 47 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकारांच्या सहाय्याने 69 धावा केल्या. चेन्नईकडून सॅम करनने 3, दीपक चहर-एन्गिडी आणि पियुष चावलाने प्रत्येकी 1-1 बळी घेतला.

- Advertisment -

ताज्या बातम्या