राजस्थानचा मुंबईवर विजय

jalgaon-digital
2 Min Read

अबुधाबी । वृत्तसंस्था

राजस्थान रॉयल्स विरुध्द मुंबई इंडियन्स यांच्यात झालेल्या सामन्यात राजस्थानच्या संघाने बाजी मारली.

नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्स संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला . प्रथम फलंदाजी करताना असलेल्या मुंबई इंडियन्सच्या संघाची राजस्थानविरुद्ध सामन्यात खराब सुरुवात झाली. धडाकेबाज खेळी करणारा क्विंटन डी-कॉक पहिल्याच षटकात बाद झाला. यानंतर इशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांनी दुसऱ्या विकेटसाठी ८३ धावांची महत्वपूर्ण भागीदारी रचली.

सूर्यकुमार यादवने ४० तर इशान किशनने ३७ धावा केल्या. यानंतर शेवटच्या ४ षटकांत मुंबईने तुफान फटकेबाजी करत ७२ धावा मारल्या. हार्दिक पांड्याने नाबाद राहत २१ चेंडूत ६० धावा केल्या.

या खेळीत त्याने तब्बल ७ षटकार ठोकले.किशन-सूर्यकुमार यांची संयमी भागीदारी आणि हार्दिक पांड्याच्या फटकेबाज ६० धावांच्या खेळीमुळे मुंबईच्या संघाने २० षटकांत १९५ धावांपर्यंत मजल मारली.

मुंबई ने राजस्थानला १९६ धावांचे आव्हान दिले , १९६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानच्या डावाची सुरूवात फारशी चांगली झाली नाही. जेम्स पॅटिन्सनने रॉबिन उथप्पा (१३) आणि स्टीव्ह स्मिथ (११) या दोघांना स्वस्तात माघारी धाडलं.

पण त्यानंतर बेन स्टोक्स आणि संजू सॅमसनने यांनी मुंबईच्या गोलंदाजांची प्रचंड धुलाई केली. वेगवान गोलंदाज आणि फिरकीपटू दोघांचेही चेंडू स्टोक्स-सॅमसन जोडीने सीमारेषेपार पाठवले. या दोघांनी शतकी भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला.

स्टोक्सने ६० चेंडूत १४ चौकार आणि ३ षटकारासह नाबाद १०७ धावा केल्या. तर संजून सॅमसनने ३१ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांच्या सहाय्याने नाबाद ५४ धावा करत त्याला उत्तम साथ दिली.

मुंबईविरूद्धच्या सामन्यात बेन स्टोक्सने केलेल्या धडाकेबाज शतकाच्या जोरावर राजस्थानने ८ गडी राखून विजय मिळवला

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *