
मुंबई | Mumbai
भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा अशी ओळख असलेल्या लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांची आज पहिली पुण्यतिथी. पण तरी देखील दीदी आपल्यामध्ये आजही आहेत… अशी भावना प्रत्येक भारतीयाच्या मनात आहेत. लतादीदी यांनी कायम संगीतावर प्रेम केलं आणि त्यांच्या गाण्यातून, आवाजातून इतरांना प्रेम करायला शिकवलं. लाखोंच्या मनावर राज्य करणाऱ्या लतादीदींची आजही तितकीच लोकप्रिय आहेत.
लता मंगेशकर यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी अभिवादन केले आहे. राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी लतादीदींचा एक हसरा फोटो लावला आहे. त्याबरोबर त्यांनी एक मोठी पोस्ट लिहित त्यांना विनम्र अभिवादन केले आहे.
राज ठाकरेंची पोस्ट
“दीदींच्या निधनाला आज एक वर्ष झालं. मागच्या वर्षी नेमक्या ह्याच दिवशी, माझ्यासकट देशातील लाखो, करोडो लोकांना काहीतरी तुटल्याची भावना जाणवली. आणि ही भावना पुढे काही काळ मनात घर करून होती. पण काही काळाने दीदींच गाणं पुन्हा कानावर पडलं आणि एक जाणवलं की मूर्त स्वरूपातील दीदी गेल्या असल्या तरी अमूर्त स्वरूपातील दीदी कायम राहणार. माझ्यासारख्या अनेकांना दीदींचा आवाज कधीही आणि कुठेही ऐकला तरी तो क्षणात ओळखता येईल, पण ह्यापुढे कदाचित अनेक पिढ्या सुद्धा हा आवाज कोणाचा आहे हे चटकन जरी नाही ओळखता आलं तरी तो तितकाच आत ओढत राहील, शांत करत राहील.
चिरंजीवी होणं म्हणजे काय असं मला विचारलं तर मी ह्यालाच चिरंजीवित्व म्हणेन. दीदींच्या आठवणी आहेत राहतील पण त्याहून अधिक खोल त्या माझ्यासकट करोडो लोकांच्या जाणिवांमध्ये राहतील.
दीदींच्या स्मृतीस माझं विनम्र अभिवादन !
राज ठाकरे”
भारतीय संगीतविश्वात लतादीदी यांचं योगदान अत्यंत मोलाचं. संगीत कलाकार म्हणून त्यांनी अनेक गाणी गायली. लतादीदी यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात १९४२ मध्ये केली. दीदींनी ९०० पेक्षा अधिक हिंदी सिनेमांमध्ये गाणी गायली. लता मंगेशकर यांचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ सली मध्ये मध्य प्रदेशातील इंदूर शहरात दीनानाथ मंगेशकर यांच्या घरात झाला होता. लता मंगेशकर दीनानाथ मंगेशकर यांच्या सर्वात मोठ्या कन्या होत्या. लतादीदी यांच्यानंतर मीना, आशा आणि उषा यांचा जन्म झाला. त्यानंतर भाऊ हृदयनाथ मंगेशकर यांचा जन्म झाला.