राज ठाकरेंचा हट्ट कायम

... तर हनुमान चालिसा लावाच; कार्यकर्त्यांना आवाहन
राज ठाकरेंचा हट्ट कायम

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

मनसे अध्यक्ष राज ठाकरे(MNS president Raj Thackeray ) मशिदीवरील भोंगे( Loudspeakers ) हटविण्यासंदर्भात ठाम आहेत. जिथे मशिदीवर भोंगे वाजविले जातील, तिथे हनुमान चालिसा वाजवा, असे आदेश त्यांनी मनसैनिकांना दिले आहेत. बांग सुरु झाल्यास पोलिसांच्या 100 क्रमांकावर फोन करुन तक्रार करा. राज्यकर्त्यांना हिंदुची ताकद काय आहे हे दाखवून द्या, असे राज ठाकरे यांनी आपल्या 3 पानांच्या पत्रात म्हटले आहे. आता नाही तर कधीच नाही, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धवजी, आपण बाळासाहेबांचे ऐकणार की शरद पवारांचे?, असा खोचक सवालही त्यांनी विचारला आहे.

मनसेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी आधी मनसेनेच्या पाडवा मेळाव्यात, त्यानंतर ठाण्यात घेतलेल्या उत्तर सभेमध्ये आणि दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र दिनाच्या दिवशी औरंगाबादमध्ये झालेल्या सभेमध्ये ( Public Meeting in Aurangabad )मशिदींवरील भोंगे उतरवण्याबाबतची आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे.

यासंदर्भात सर्व मशिदींवरील भोंगे उतरवण्याबाबत राज ठाकरेंनी राज्य सरकारला 3 मे चा अल्टिमेटम दिला होता. त्यात औरंगाबादमधील सभेसंदर्भात राज ठाकरेंविरोधा गुन्हा देखील दाखल झाला आहे. या पार्श्वभूमीवर आता राज ठाकरे भोंगे उतरवण्याबाबत नेमकी काय भूमिका घेतात, याविषयी उत्सुकता ताणली गेली होती. याबाबत राज ठाकरेंनी आता जाहीर पत्रक काढून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आमचे मुस्लीम धर्मियांना एवढेंच सांगणे आहे की हा सामाजिक विषय आहे हे आधी समजून घ्या. या विषयाला धार्मिक वळण देण्याचा प्रयत्न केला, तर आमच्याकडून त्याचे उत्तर धर्मानेच दिले जाईल, असा इशारा राज ठाकरेंनी आपल्या पत्रातून दिला आहे.

देशातल्या तमाम हिंदू बांधवांना माझी विनंती आहे की उद्या 4 मे रोजी जिथे जिथे यांचे भोंगे अजान, बांग देतील, तिथे तिथे आपण भोंग्यांवर हनुमान चालीसा लावावी. भोंग्यांचा त्रास काय होतो हे त्यांनाही समजू दे. आम्हाला देशातली शांतता बिघडवायची नाही. देशात आम्हाला दंगलीही नकोत. परंतु आपण धर्मासाठी हट्टीपणा करणे सोडणार नसाल, तर आम्हीही आमचा हट्ट सोडणार नाही, असे राज ठाकरेंनी आपल्या पत्रात स्पष्ट केले आहे.

आपल्या पत्रातून राज ठाकरेंनी त्यांच्यावर गुन्हा नोंदवणार्‍या पोलिसांनाच आवाहन केलें आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या पोलीस अधिकार्‍यांना माझी हात जोडून विनंती आहे की या देशात, या राज्यात कायद्याचे राज्य आहे हे त्यांनी दाखवून द्यावे. त्यांनी अनधिकृत मशिदी, अनधिकृत भोंगे, रस्त्यांवर होणारे नमाज पठण यांना जबाबदार असलेल्या लोकांना आपला पोलिसी खाक्या दाखवावा, असे राज ठाकरे पत्रात म्हणाले आहेत.

औरंगाबादेत गुन्हा दाखल

चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी मनसेना अध्यक्ष राज ठाकरेंवर औरंगाबादेतील सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सभेत 16 पैकी 12 अटींचे उल्लंघन राज ठाकरे आणि आयोजकांनी केले असा आरोपही ठेवण्यात आला आहे.दरम्यान मुंबईतील राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या शिवतिर्थावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावला जात असून त्यांना अटक होणार का हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही.

अटकेची पहिली कारवाई

मनसनेेचे नेते महेंद्र भानुशाली यांना पोलिसांनी अटक केली आहे. मुंबईत सर्वप्रथम त्यांनी भोंगे लावले होते. भानुशाली हे चांदिवली मनसेचे विभाग अध्यक्ष आहेत. राज ठाकरेंनी सांगिल्या प्रमाणे त्यांनी सर्व प्रथम भोंग्यांवर हनुमान चालिसा लावली होती. पोलिसांनी कारवाई दरम्यान त्यांच्याकडील काही भोंगे घेतले ताब्यात घेतले आहेत.

Related Stories

No stories found.