Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याम्युकरमायकोसिस आजाराबाबत जनजागृती करा

म्युकरमायकोसिस आजाराबाबत जनजागृती करा

मालेगाव । प्रतिनिधी

रोग प्रतिकारशक्ती अत्यंत कमी असलेल्या तसेच उच्च रक्तदान व मधुमेह असलेल्या करोना बांधितांना म्युकरमायकोसिस या नवीन आजाराचा त्रास जाणवत असल्याचे निदर्शनास आले आहे. या आजाराची व्याप्ती लक्षात घेत शासनाने महात्मा जन आरोग्य योजनेत त्याचा समावेश केला आहे. त्वरित उपचार झाल्यास या आजारावर मात देता येऊ शकते. त्यामुळे रुग्णांनी घाबरू नये. या आजारापासून रुग्णांना दिलासा देण्यासाठी कान, नाक, घसा तज्ञ डॉक्टरांनी उपचाराबरोबरच आजारासंदर्भात रुग्णांची जनजागृती करत दिलासा द्यावा, असे आवाहन कृषिमंत्री दादा भुसे यांनी केले.

- Advertisement -

येथील शासकीय विश्रामगृहात करोना पाठोपाठ म्युकरमायकोसीस आजार रुग्णांना उद्भवत आहे. या आजारासंदर्भात वेगवेगळ्या चर्चेमुळे रुग्णांमध्ये संभ्रम व भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर या आजारावर उपाययोजनांचे नियोजन करण्यासाठी कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासन व आरोग्य यंत्रणेसह शहरातील कान, नाक, घसा तज्ञ डॉक्टरांची बैठक घेण्यात येवून या उपचारासंदर्भात नियोजन केले गेले.

अप्पर जिल्हाधिकारी धनंजय निकम, उपमहापौर नीलेश आहेर, प्रांत विजयानंद शर्मा, वैद्यकिय अधिकारी डॉ. हितेश महाले, डॉ. सपना ठाकरे, मनोहर बच्छाव, विनोद वाघ, डॉ. अनिल मुळे, मनोज चोपडे, पीयुष रणभोर, पुष्कर आहेर, प्रशांत वाघ, दत्तात्रेय पाटील, दर्शन ठाकरे, लोधे, बोहरा, बिर्‍हाडे, संदीप ठाकरे, अभय पोतदार, दीपक पवार, धनश्री देवरे, अफाक, जतीन कापडणीस आदी कान, नाक, घसा तज्ञ डॉक्टर उपस्थित होते.

करोना बाधितांची संख्या कमी होत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेसह जनतेला मोठा दिलासा मिळाला होता. मात्र म्युकरमायकोसिस या आजारामुळे आरोग्य यंत्रणेसमोर पुन्हा नवीन आव्हान उभे ठाकले आहे. करोनामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी झालेल्या तसेच ज्यांना उच्च मधुमेह व रक्तदाबाचा त्रास आहे अशांना हा आजाराचा धोका अधिक असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले असल्याचे स्पष्ट करत ना. भुसे पुढे म्हणाले. या आजाराची लक्षणे जाणवताच तत्काळ तज्ञ डॉक्टरांकडून रूग्णांनी उपचार सुरू करावेत. या उपचाराकडे दुर्लक्ष केल्यास धोका वाढू शकतो मात्र वेळीच उपचार झाल्यास धोका टळू शकतो त्यामुळे उपचाराकडे दुर्लक्ष करू नये, असे आवाहन केले.

संभाव्य तिसर्‍या लाटेत लहान बालकांना अधिक धोका संभवत असल्याचे भाकीत वर्तविण्यात येत असल्यामुळे शहरातील बालरुग्णालयातही ऑक्सिजन बेडची संख्या वाढविण्यावर भर देण्यात यावा. लहान मुलांची विशेष काळजी घेण्याची जबाबदारी पालकांनी घेऊन त्यांना घराबाहेर जाण्यापासून रोखावे, असे आवाहन करत कृषिमंत्री भुसे यांनी बालरुग्णालयांमध्ये ऑक्सिजन कॉन्सट्रेटरची संख्या वाढविण्यात यावी. भविष्यातील संभाव्य धोके ओळखून शासनासह महानगरपालीका व खाजगी रुग्णालयांनी आपसात समन्वय ठेवून या आजाराचे उच्चाटन करण्यासाठी पुढाकार घेण्याचे निर्देश दिले.

करोनासह म्युकरमायकोसिस आजाराला सामोरे जाण्यासाठी आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. या संकटावर मात देण्यासाठी शहर व तालुक्यातील सर्व खासगी डॉक्टरांनी सामाजिक बांधिलकीतून रुग्णसेवेत योगदान दिल्यास या आजारांवर मात करण्यास वेळ लागणार नाही. करोनामुक्त झालेल्या मात्र उच्च मधुमेह असलेल्या रूग्णांवर विशेष लक्ष ठेवण्याची गरज आहे. खासगी डॉक्टरांनी आरोग्य यंत्रणेस सहकार्यासाठी पुढे यावे, असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी धनंजय निकम यांनी यावेळी बोलतांना केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या