
नाशिक । प्रतिनिधी Nashik
शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात बुधवारी (दि.28) सलग तिसर्या दिवशी पावसाने हजेरी लावली. पाऊस झिमझिम स्वरूपातच पडत असून जिल्ह्याला जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. या पावसामुळे खरीप हंगामातील मशागतीच्या कामांना वेग आला आहे.
नाशिक, जळगाव, संभाजीनगर, अहमदनगर भागात पुढील दोन दिवस म्हणजेच दि. 29,30 जून व दि.1 जुलैला जळगाव, धुळे संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढेल. नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार घाट माथ्यावर तीव्र स्वरूपाचा म्हणजेच 60 ते 70 मिमी पाऊस होईल आणि पूर्वेकडील भागात 40 ते 50 मिमी पाऊस होईल.
काही भागात मध्यम पाऊस होईल. दि.1 ते 4 जुलै या काळात राज्यातील अंतर्गत भागात वळिव पाऊस अधून मधून सक्रिय होईल. दि.4 ते 6 जुलै विदर्भ आणि लगतच्या मराठवाडा भागात वळिव जोरदार पाऊस होईल. दि.28 जून ते 1 जुलै या काळात राज्यात मान्सून सक्रिय राहील.या काळात विजांचा पाऊस कमी होऊन मान्सूनचा पाऊस सुरू होईल. या काळात विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्रचा घाटाचा भाग आणि लगत जोर अधिक राहील,अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
जुलैमध्ये कमी दाब उपसागरावर निर्माण होत राहून पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होईल आणि ऑगस्टमध्ये एल निनो तीव्र होणार असला तरी हिंदी महासागरावर आयओडी देखिल जुलैपासून पॉझिटीव्ह होणार असल्यामुळे या काळात पावसाचा जोर वाढणार आहे, असे हवामान अभ्यासक विजय जायभावे यांनी सांगितले.