राज्यात मुसळधार; नाशिक जिल्ह्यात पावसाअभावी पेरण्या वाया जाण्याची भीती

राज्यात मुसळधार;  नाशिक जिल्ह्यात पावसाअभावी पेरण्या वाया जाण्याची भीती

मुंबई । वृत्तसंस्था Mumbai

राज्यातील बहुतांश भागात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात पावसाचा जोर वाढला आहे. तसेच मध्य महाराष्ट्र, खानदेश, मराठवाड्यात सर्वदूर हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसाने मुंबई आणि उपनगरात अक्षरश: कहर केला आहे. यामुळे मुंबईची लाइफलाइन समजली जाणारी लोकल सेवा विस्कळीत झाली आहे.

दरम्यान, मुंबईसह ठाणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांतील शाळांना सुटी देण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत सांगितले. हवामान विभागाने पुढील दोन-तीन दिवसांसाठी पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून चार जिल्ह्यांतील शाळांना सुटी जाहीर केल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले. तसेच, पावसाचा जोर पाहता, ज्यादा बसेस सोडण्याचेही निर्देश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

मुंबई शहर आणि उपनगरांत मुसळधार पावसामुळे लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. पावसाचा सर्वाधिक फटका मध्य रेल्वेला बसला आहे. रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक डोंबिवली ते कसारा/कर्जतपर्यंत पूर्णपणे ठप्प झाली असून सध्या सीएसएमटी ते डोंबिवली अशी लोकल सेवा सुरू आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. मध्य रेल्वेची लोकल सेवा फक्त डोंबिवलीपर्यंत सुरू असल्याची घोषणा भायखळा रेल्वे स्थानकात करण्यात आली.

पावसाच्या दमदार हजेरीमुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांवरही परिणाम झाला आहे. कोल्हापूर-सीएसएमटी गाडी पुण्यात थांबवण्यात आली आहे. तसंच पुणे-सीएसएमटी इंटरसिटी एक्स्प्रेस, पुणे-सीएसएमटी डेक्कन एक्स्प्रेस, पुणे-सीएसएमटी इंद्रायणी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. यासोबतच सीएसएमटीहून पुण्याकडे जाणारी सिंहगड एक्स्प्रेस देखील रद्द करण्यात आली आहे. मुसळधार पावसाचा अंदाज घेता उद्या पुणे-सीएसएमटी एक्स्प्रेस आणि सीएसएमटी-पुणे सिंहगड एक्स्प्रेस रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय सीएसएमटी-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस, सीएसएमटी-पुणे डेक्कन एक्स्प्रेस आणि सीएसएमटी-पुणे इंद्रायणी एक्स्प्रेस या गाड्याही उद्या धावणार नाहीत, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.

राज्यभरात दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसामुळे नाल्यांना नद्याचे स्वरूप निर्माण झाले आहे.अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.त्यामुळे काही मार्ग बंद करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.अनेक ठिकाणी गावांमध्ये नद्यांचे पाणी शिरले आहे. कोकणात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत आहे. रायगड जिल्ह्यात पावासाचा जोर वाढला असून, पाताळगंगा नदीला पूर आला आहे. नदीच्या पाणीपातळीने धोक्याची इशारा पातळी ओलांडली आहे.रायगड जिल्हा प्रशासनाने खबरदारी म्हणून सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी दिली आहे.आंबेनळी घाटात दरड कोसळली आहे. महाबळेश्वरहुन पोलादपूरकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. आंबेनळी घाटातून प्रवास न करण्याचे आवाहन नागरिकांना प्रशासनाने केले आहे.कोल्हापुरातील पंचगंगा नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढत असून सध्या 23 फुट झाली आहे. 25 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

हवामान विभागाकडून पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि यवतमाळ या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पडण्याची शक्यता आहे. या पावसामुळे रखडलेली खरिपाच्या पेरण्यांना वेग येणार आहे. तसेच पावसाने ओढ दिलेल्या भागातील पिकांना जीवदान मिळणार आहे.

सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश

राज्यात मुसळधार पाऊस होत असून कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार होऊ नये म्हणून सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. नागरिकांनी देखील आवश्यक त्या कामाशिवाय बाहेर पडू नये आणि सुरक्षित स्थळी राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.एनडीआरएफ तसेच एसडीआरएफच्या तुकड्या तैनात आहेत. तसेच मुंबई आणि परिसरातील मंत्रालयासह सर्व शासकीय कार्यालयांतील अधिकारी, कर्मचार्‍यांना कामावरून लवकर सोडल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

लोकल खोळंबली,बाळ गमावले

लोकल सेवा ठप्प झाल्यामुळे प्रवाशांना फटका बसत आहे. अशात ठाकुर्लीनजीक एक दुर्दैवी घटना घडली आहे. अंबरनाथ लोकल ठाकुर्लीजवळ दोन तास थांबली असता एक महिला तिच्या चार महिन्याचे बाळ आणि तिच्या काकासह रेल्वे ट्रॅकवर उतरली. त्यावेळी त्या काकाच्या हातून बाळ निसटले आणि ते बाजूला असलेल्या नाल्यातील वाहत्या पाण्यात पडले. आज दुपारी 3 वाजता ही दुर्दैवी घटना घडली. या नाल्यावरून लहान खांबावरून चालताना हे बाळ निसटल्याची माहिती आहे.हा नाला पुढे जाऊन खाडीला मिळतो.कल्याण लोहमार्ग पोलिस दाखल होत त्यांनी शोध सुरू केला आहे.

नाशिक जिल्ह्यात पावसाअभावी पेरण्या वाया जाण्याची भीती

नाशिक । प्रतिनिधी

जुलै महिन्याचा दुसरा आठवडा संपला असून महाराष्ट्राच्या विविध भागात जोरदार पाऊस होत असताना नाशिक जिल्ह्यावर मात्र पावसाने आपली वक्रदृष्टी कायम ठेवली आहे. पावसाअभावी जिल्ह्यातील धरणांनी तळ गाठला असून खरिपाच्या पेरण्याही काही भागात खोळंबल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांमध्ये काहूर माजले असून मोठ्या पावसाच्या प्रतिक्षा करत आहे.

हवामान विभागातर्फे पावसाची शक्यता जेव्हा जेव्हा वर्तवली जात आहे.त्यानुसार राज्यात ठिकठिकाणी जोराचा व मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळत आहे. मात्र, नाशिक जिल्ह्याचा विचार करता हवामान खात्याचा अंदाज मात्र अजूनही चुकतआहे, असेच काहीसे चित्र आहे.

जिल्ह्याच्या पश्चिम भागातील इगतपुरी,पेठ त्रंबकेश्वरचा भाग वगळता उर्वरित जिल्ह्यात मात्र पावसाने ओढ दिली आहे.जुलै महिन्याचा शेवटचा आठवडा उजाडणार असताना देखील जिल्ह्यात टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आलेली आहे. खरिपाच्या पेरण्याही पावसाअभावी खोळंबल्या आहेत.जिल्ह्यातील ज्या ज्या शेतकर्‍यांनी उपलब्ध ओलीवर खरिपाच्या पेरण्या उरकल्या.त्यापैकी पिके आता कोंबाच्या अवस्थेत असून या पिकांनाही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. समाधानकारक पाऊस झाला नाही तर खरिपाच्या पेरण्याही वाया जाणार की काय? अशी भीती शेतकर्‍यांना वाटू लागली आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com