Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याजिल्ह्यात पावसाने वाढवली चिंता

जिल्ह्यात पावसाने वाढवली चिंता

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जून महिना कोरडा गेला. जुलैत पावसाने काहीअंशी हजेरी लावली. मात्र, पुन्हा वरुणराजाने नाशिक जिल्ह्याकडे पाठ फिरवली. आता ऑगस्ट महिन्याचे 15 दिवस उलटूनही नाशिक जिल्ह्याला पावसाची प्रतीक्षा कायम आहे. जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पेरणी झालेली असून पेरणीनंतर दमदार पाऊसच झाला नसल्याने पिके कोमेजून पडली आहेत.आता पाऊस झाला नाही तर बळीराजावर दुबार पेरणीचे संकट ओढवेल. परिणामी आर्थिक संकटही कोसळणार आहे.

- Advertisement -

मनमाड-लासलगाव रस्त्यावरील काही गावांमधील शेतजमिनी कोरड्या आहेत. नांदगाव, येवला, सिन्नर तालुक्यातही यापेक्षा वेगळी स्थिती नाही. जुलैमध्ये झालेल्या पावसानंतर शेतकर्‍यांनी खरिपाची पेरणी केली. मात्र, त्यानंतर पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. अनेक ठिकाणी भुईमूग, उडीद, सोयाबीन, मका आदी पिकांची पेरणी झालेली असून यापिकांची वाढ पावसाअभावी पाहिजे तितकी झालेली नाही. मरगळलेली पाने, कोमेजलेली झाडे असे दृश्य सहसा ऑगस्ट महिन्यात दिसत नाही. ऑगस्टमध्ये पावसाने तरतरी भरलेली पिके आपल्याला पाहायला मिळतात.

मात्र, यंदा पाऊस आपल्या जिल्ह्यावर रुसून बसल्याचे चित्र सध्या तरी दिसून येत आहे. सध्याच्या पिकांच्या परिस्थितीवर बोलताना शेतक़र्‍यांकडून आता पाऊस आला तरी उत्पादनावर त्याचा परिणाम होणार असून उत्पादन कमी प्रमाणात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जिल्ह्यात ऑगस्ट महिन्याच्या मध्यापर्यंत सरासरीच्या तुलनेत अवघ्या 39.8 टक्के पावसाची नोंद झाली आहे. समाधानकारक पावसाअभावी काही तालुक्यांमध्ये पिके पिवळी पडली असून कांदा रोपांची लागवडही खोळंबली आहे. अनेक भागात दुबार पेरण्यांचे संकट कोसळण्याची चिन्हे आहेत. चांगला पाऊस न झाल्यास पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण होईल, खरीपापाठोपाठ रब्बी हंगामही वाया जाईल, या शक्यतेने शेतकरी हतबल झाले आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

42.2 टक्के पाऊस

तालुकानिहाय पावसाची आतापर्यंतची टक्केवारी : दिंडोरी 71.8 सुरगाणा 54.3 बागलाण 44 पेठ 51.4 कळवण 50.4 त्र्यंबकेश्वर 47 सटाणा 44.6 मालेगाव 41.2, निफाड 39.1 इगतपुरी 38.1 येवला 38.5 देवळा 36.1 चांदवड 30.5 नाशिक 34.4 नांदगाव 30.1, सिन्नर 29.4. एकूण 42.2 टक्के.

तीन धरणे कोरडीठाक

पाणलोट क्षेत्रात जुलैत चांगला पाऊस झाल्याने जिल्ह्यातील काही धरणांची पातळी वाढली. सद्यस्थितीत जिल्ह्यात 42,485 दशलक्ष घनफूट (65 टक्के) इतका पाणीसाठा आहे. त्र्यंबकेश्वर, आंबोली भागातील वृष्टीने नाशिकला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण 91 टक्के भरले आहे. गंगापूर धरण समूहातील काश्यपीत 59 टक्के, गौतमी गोदावरीत 58 तर आळंदीत 75 टक्के पाणी आहे. नागासाक्या, तीसगाव, माणिकपुंज हे कोरडेठाक आहेत.

आज जोरदार पावसाचा अंदाज

शनिवारी (दि.19) नाशिक जिल्ह्यातील काही ठिकाणी जोरदार पाऊस व मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. ग्रामीण कृषी मोसम सेवा जिल्हा कृषी हवामान केंद्र महात्मा फुले कृषी विद्यापीठ, विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी यांच्या वतीने वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार दि. 19 व 23 ऑगस्टदरम्यान जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता आहे. तसेच पुढील पाच दिवस आकाश ढगाळ राहणार आहे.

धरणसाठा (कंसात टक्केवारी)

गंगापूर 5140 (91) काश्यपी 1089 (59) गौतमी गोदावरी 1077 (58) आळंदी 609 (76) पालखेड 286 (44) करंजवण 3103 (58) वाघाड 1690 (73) ओझरखेड 794 (37) पुणेगाव 571 (92) दारणा 6705 (94) भावली 1434 (100) मुकणे 5562 (77) वालदेवी 1133 (100) कडवा 1455 (86) नांदूरमध्यमेश्वर 257 (100) भोजापूर 237 (66) चणकापूर 1901 (78) हरणबारी 1166 (100) केळझर 572 (100) गिरणा 6905 (37) पुनद 795 (61).

- Advertisment -

ताज्या बातम्या