पाऊस… महापूर… धास्ती…!

नाशिक । चेतन राजापूरकर Nashik

पूर ( Flood )येणे ही नैसर्गिक आपत्ती मानली जाते. मात्र सराफ बाजाराचा ( Saraf Bazar ) पूर हा निसर्ग निर्मित नसून तर मानव निर्मित आहे. हे न समजलेल्या आणि त्यावर कोणत्याही उपाययोजनेसाठी महापालिका पुढाकार कधी घेईल? असे म्हणण्याची वेळ आली आहे.

प्रत्येक पावसात सराफ बाजारात पाणी शिरत असून, उपाययोजना करण्यात राज्य सरकार व नाशिक महापालिका अकार्यक्षम ठरली आहे. हे अपयश शेकडो सराफ बाजारातील व्यापारी, कामगारांच्या जीवावर आल्यानंतरही नाशिक महानगरपालिकेला (NMC) झोप कशी येते असा प्रश्न पडतो.

नाशिकच्या पुराच्या इतिहासाचा बारकाईने विचार केल्यास 2016 सालाच्या अगोदर 150 वर्षात आपण डोकावले तर 1939, 1969, 2008 निसर्गनिर्मित महापूर सराफ बाजारात आलेल्याच्या नोंदी मिळतात म्हणजे अगदी 150 वर्षात 3 पूर आणि 2016 पासूनचा विचार केला तर 2016 पासून प्रतिवर्षी 3-5 पूर सराफ बाजारात येतो तेही गोदावरीला पूर नसतांना सुद्धा. यात अनेक व्यवसायिकांचे नुकसान होत आहे.

नेमकं 2016 पासूनच काय बदल झाला म्हणून पूर सराफ बाजारात येऊ लागला? की नाशिक महापालिकेने विकासाच्या नावावर आणि स्मार्ट सिटीच्या नावावर मलिदा खाल्ल्याने हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न होताना दिसत नाहीत. प्रश्न जितके वाढतील तितके टेंडर निघतील अशी महापालिकेची भूमिका दिसते आणि त्यात शंका आणि संशय निर्माण होत आहेत.

सराफ बाजारात येणार्‍या पुराचे खरे कारण म्हणजे केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजनेअंतर्गत 2015 साली सुमारे 310 कोटी रुपये खर्चून केलेली पावसाळी गटार योजना. नाशिकची भौगोलिक स्थिती पाहता ही कुचकामी ठरेल हे माहिती असताना सुद्धा या योजनेचे अनेक फायदे पटवून देत प्रशासनाने ही योजना शहरात राबवली. या योजने अंतर्गत पावसाचे पाणी हे सीबीएसहून पुढे खडकाळी, सारडा सर्कल मार्गे शहराच्या बाहेर तपोवनपर्यंत नेणार होते.

मात्र ही योजना खडकाळी सिग्नलपर्यंतच पोहचली.त्यानंतर महानगरपालिकेत विशेष महासभा दाखवून ठराव दाखवला गेला. ही योजना भद्रकाली येथे पंपिंग स्टेशन उभारून येथे आणली गेली म्हणजे जवळपास निम्म्याहून कमी कामच झाले.

या पंपिंग स्टेशनची क्षमता फक्त 17 एमएलइ. पावसाच्या पाण्याचा विचार केल्यास या स्टेशनची क्षमता अगदी कमी असल्याने पावसाचे पाणी आल्यावर यातून सरळ सरस्वती नाल्यात सोडले जाते. मात्र या नाल्याची क्षमता बघता हे पाणी वाहून न जाता रस्त्यावर जमा होते व नासिकचा खोल भाग असल्याने हे सर्व पावसाचे पाणी नाशिकची मुख्य बाजारपेठ असलेला दहीपुल व सराफ बाजार या भागात जमा होते. असा हा सराफ बाजाराचा पूर.

दुसरे मुख्य कारण म्हणजे 1972 साली गावठाणातील मुख्य नाला म्हणजेच सरस्वती नदी यावर स्लॅब टाकून बंद केला. मात्र तेव्हापासून आजपर्यंत या नाल्यातील गाळ काढला गेलेला नाही.त्यामुळे जवळपास 70% नाला हा गाळाने भरलेला असल्याने पाणी वाहून नेण्याची क्षमता नाल्याची कमी झालेली आहे.

दरवर्षी प्रशासनातर्फे कागदोपत्री नालेसफाईचे काम होते. मात्र प्रत्यक्षात गाळ काढायचे काम आजपर्यंत झालेले नाही. हे देखील एक प्रमुख कारण आहे. सराफ बाजारातील पुराचे तिसरे कारण म्हणजे या भागातील रस्ते,वार्डाच्या विकासकामात वाढत गेलेल्या रस्त्याच्या स्लॅबची उंची.

गावठाणातील अनेक रस्त्यांचे काम करतांना रस्ताच्या उंचीचा विचार झालेला नाही. त्यामुळे भरपूर ठिकाणी रस्ते हे दुकान व घराच्या उंचीपेक्षा उंच झालेले आहेत.थोडा पाऊस जरी झाला की पाणी हे सरळ दुकानात व घरात घुसते असा हा मानवनिर्मित पूर.

यामुळे येथील व्यवसायिक व रहिवाश्यांचे आर्थिक नुकसान हे दरवर्षी ठरलेलेच.यामुळेच नाशिकची महत्वाची बाजारपेठ सराफ बाजार हा पुररेषेत टाकण्यात आला. यामुळे येथे असलेले रहिवाशी व व्यवसायिकांचे घर, दुकाने नव्याने बांधकामास मर्यादा आल्याने या भागातील विकास खुंटला किंबहुना संपलाच.

या भागातील अनेक इमारती या 100 वर्ष जुन्या असल्याने या इमारतीत सुधारणा अथवा पुनर्बांधणी करणे आता शक्य होणार नाही. हजारो कोटींचा खर्च करूनही महापालिकेला नाशिकच्या समस्या सोडविता येत नसतील तर याचा परिणाम येथील व्यवसायावर, व्यापारावर आणि नाशिकच्या एकूण मानसिकतेवर होणार आहे. हे नाशिक महापालिकेला कळेल का? असा प्रश्न विचारावा लागेल.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *