Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यारेल्वेे वेळापत्रक बदलणार; वेग वाढणार

रेल्वेे वेळापत्रक बदलणार; वेग वाढणार

मनमाड । बब्बू शेख Manmad

रेल्वे प्रशासनतर्फे ( Railway Administration )वेगवेगळ्या उपाययोजना करण्याबरोबरच मोठे फेरबदल केले जात असल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली. करोनाकाळात ( Corona Period ) लॉकडाऊनमुळे गाड्या बंद होत्या. त्यादरम्यान रेल्वेचे नवीन वेळापत्रक ( Railway New Schedule ) तयार करण्यात आले आहे. त्यानुसार देशभरातील तब्बल आठ हजारांपेक्षा जास्त गाड्यांचे वेळापत्रक बदलणार आहे. वेळेत पाच मिनीट ते दीड तास बदल केला जाणार आहे. तसेच वेगात वाढ होणार आहे, असे रेल्वेच्या सूत्रांंनी सांगितले.

- Advertisement -

नव्या वेळापत्रकानुसार उशिरा धावणार्‍या गाड्यांंवर अंकुश लागणार आहे. त्यामुळे प्रवाशांच्या वेळेची बचत होणार आहे. करोना पूर्णपणे आटोक्यात आल्यास नवीन वेळापत्रक 2022 पासून लागू केले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, ज्या गाड्या तोट्यात चालतात अशा सुमारे 500 रेल्वेगाड्या करण्याबरोबरच देशभरातील सुमारे एक हजार पॅसेंजर गाड्यांचा दर्जा वाढवून त्यांना एक्स्प्रेस करण्याचा विचार केला जात आहे. नवीन धोरणानुसार 10 हजार छोट्या रेल्वेस्थानकांवर असलेल्या गाड्यांचा थांबा बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला फटका बसणार आहे.

रेल्वे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, करोनाकाळात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे काहीकाळ जवळपास सर्वच रेल्वेगाड्या बंद होत्या. गाड्या रुळावरून धावत नसल्याची संधी साधून रेल्वे प्रशासनाने अर्धवट असलेली कामे पूर्ण करून घेतली शिवाय नवीन कामेदेखील युद्धपातळीवर करण्यात आली आहेत. लॉकडाऊनमुळे रेल्वे प्रशासनाने मोठे फेरबदल करण्याचा निर्णय घेत सर्वप्रथम प्रवाशांच्या वेळेची बचत होईल, यासाठी देशभरातील तब्बल 8 हजार 202 प्रवासी गाड्यांच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी नवीन वेळापत्रक तयार करण्यात आले आहे.

या वेळापत्रकानुसार कमीत कमी पाच मिनीट तर जास्तीत जास्त दीड तासाचा बदल होऊन गाड्यांचा वेग वाढणार आहे. कोणत्या विभागात आणि कोणत्या गाड्यांमध्ये प्रवाशांची संख्या कमी आहे याची माहिती घेण्यात आल्यानंतर 73 विभागांतील 500 गाड्या अशा आहेत की त्यात प्रवाशांची संख्या फार कमी असल्याने त्या एकप्रकारे तोट्यात चालत असल्याची माहिती मिळाल्यानंतर या गाड्या बंद करण्याचा निर्णय जवळपास झाला आहे.

तसेच सुमारे एक हजार पॅसेंजर रेल्वेला एक्स्प्रेस करण्याचा विचार केला जात असल्याने देशभरातील सुमारे दहा हजार छोट्या रेल्वे स्थानकांवर असलेला या गाड्यांचा थांंबा रद्द होण्याची दाट शक्यता आहे. कदाचित भुसावळ ते मुंबई, भुसावळ ते नाशिकदरम्यान धावणार्‍या पॅसेंजरचे रूपांतर एक्स्प्रेसमध्ये होण्याची शक्यता आहे, तर मनमाड-इगतपुरीदरम्यान धावणारी शटल आणि प्रवाशांची संख्या कमी असल्याचे कारण पुढे करून मनमाड-कुर्ला गोदावरीदेखील बंद होऊ शकते .

असे झाले तर ग्रामीण आणि शहरी भागातील प्रवाशांसोबत रोज अप-डाऊन करणारे चाकरमाने, विद्यार्थी यांची मोठी गैरसोय होईल, त्यामुळे रेल्वे प्रशासनाने पॅसेंजरला एक्स्प्रेस करताना आणि गाड्या बंद करताना प्रत्येक ठिकाणी व्यवसाय न पाहता ग्रामीण भागातील गोरगरीब जनता आणि तुटपुंज्या वेतनावर काम करणारे सुशिक्षित तरुण, विद्यार्थी यांचादेखील विचार करावा. तसेच स्थानिकांचा विचार करावा, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या