Saturday, May 11, 2024
Homeमुख्य बातम्यारेल्वेने पोहचवला 2960 मे.टनपेक्षा अधिक ऑक्सिजन

रेल्वेने पोहचवला 2960 मे.टनपेक्षा अधिक ऑक्सिजन

नवी दिल्ली । वृत्तसंस्था

देशात करोनाच्या दुसर्‍या लाटेचे संकट निर्माण झालेले आहे. दररोज लाखांच्या संख्येत करोनाबाधित वाढत असल्याने, आरोग्य यंत्रणा कोलमडत आहे. अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, बेड आदींसह लस, इंजेक्शन व औषध तुटवडा निर्माण झालेला आहे.

- Advertisement -

या पार्श्वभूमीवर मिळेल त्या ठिकाणाहून मेडिकल ऑक्सिजन घेऊन तो राज्यांपर्यंत पोहचवण्याचे काम सध्या केंद्र सरकारकडून सुरू आहे. यासाठी प्रमुख मदत ही भारतीय रेल्वेची होत आहे. आतापर्यंत भारतीय रेल्वेने 2960 मेट्रीक टन पेक्षा जास्त ऑक्सिजन विविध राज्यांपर्यंत पोहचवला आहे.

याबाबतची सविस्तर माहिती रेल्वे मंत्रालयाकडून देण्यात आलेली आहे. भारतीय रेल्वेने आतापर्यंत 2960 मेट्रीक टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजन (एलएमओ) देशभरातील विविध राज्यांना 185 टँकरमध्ये वितरीत केला आहे. 47 ऑक्सिजन एक्स्प्रेसने आतापर्यंत त्यांचा प्रवास पूर्ण केलेला आहे. अशी माहिती रेल्वे मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.महाराष्ट्रात 174 एमटी, उत्तर प्रदेशात 729 एमटी, मध्यप्रदेशमध्ये 249 एमटी, हरयाणामध्ये 305 एमटी, तेलंगणात 123 एमटी आणि दिल्लीत 1334 एमटी ऑक्सिजन उतरवले गेले आहे. असे देखील सांगण्यात आले आहे.

सध्या 18 टँकर 260 एमटी ऑक्सिजनसह महाराष्ट्र, हरयाणा आणि दिल्लीच्या वाटेवर आहेत. अधिक भार असलेल्या ऑक्सिजन एक्स्प्रेस रात्रीनंतर प्रवासाला सुरूवात करणे अपेक्षित आहे. अशी माहिती रेल्वे मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या