
नवी दिल्ली | New Delhi
गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (MP Rahul Gandhi) हे आपल्या वेगवेगळ्या भूमिकांवरून चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे. दोन महिन्यांपूर्वी राहुल गांधी यांनी त्यांच्या नियोजित दौऱ्यावेळी एका शेतात (Farm) जाऊन भाताची लागवड केली होती. त्यानंतर राहुल गांधी हे काही दिवसांपूर्वी एक ट्रक चालवतांना दिसले होते. यानंतर राहुल गांधींनी दिल्लीतील करोल बाग परिसरात (Karol Bagh Area) असलेल्या एका बाजारपेठेतील एका गॅरेजमध्ये जात मॅकेनिकसोबत संवाद साधला. तसेच त्यांनी आपल्या हाताची कमाल दाखवत तेथील एक दुचाकी दुरुस्त करत असल्याचे पाहायला मिळाले होते...
त्यानंतर आज पुन्हा एकदा राहुल गांधींचा हा साधेपणाचा स्वभाव पाहायला मिळाला असून त्यांनी दिल्लीच्या आनंद विहार रेल्वे स्टेशनवर (Anand Vihar Railway Station) जात हमालांची भेट घेतली. यावेळी राहुल गांधी यांनी हमालांचा पोशाख परिधान केल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. नुकताच त्यांचा एक व्हिडीओ समोर आला असून त्यात राहुल गांधी यांनी हमालांचा पोशाख घातलेले दिसत आहे. तसेच राहुल यांनी हमालाचा (Porter) ७५६ क्रमाकांचा बिल्लाही घातलेला दिसून येत आहे. विशेष म्हणजे राहुल गांधी यांनी प्रवाशांचे सामान डोक्यावर उचलून घेतल्याचे दिसून आले. यावेळी राहुल गांधी यांच्यावर हमाल खुश असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.
यावेळी राहुल गांधींनी भेट घेतल्यानंतर हमाल म्हणाले की, राहुल गांधी आम्हाला भेटायला आले याचा आम्हाला खूप आनंद झाला आहे. राहुल गांधी यांनी आम्हाला आश्वासन दिले आहे की, ते आम्हा हमालांच्या सर्व समस्या सरकारसमोर ठेवतील आणि समस्या सोडवल्या जातील," असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, काँग्रेस (Congress) पक्षाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर (पूर्वीचे ट्विटर) राहुल गांधी आणि हमालांच्या भेटीचे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, "राहुल गांधी यांनी आज दिल्लीतील आनंद विहार रेल्वे स्थानकावर आपल्या हमाल बांधवांची भेट घेतली. नुकताच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये रेल्वे स्टेशनच्या हमालांनी बांधवांनी राहुल गांधींना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर आज राहुल गांधी यांनी भेट दिली आहे आणि त्यांनी त्यांच्याशी संवाद साधला", असे त्यांनी म्हटले आहे.