अवघ्या 2 हजार हेक्टरवर पेरण्या

रब्बी हंगाम : पावसाने शेतकर्‍यांच्या तोंडचे पाणी पळविले
अवघ्या 2 हजार हेक्टरवर पेरण्या

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

दरवर्षी पाऊस न झाल्याने अडचणीत येणारा शेतकरी यंदा अतिरिक्त पावसामुळे अडचणीत आला आहे.

जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी आतापर्यंत अवघ्या 2 हजार हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. शेतात साचलेले पाणी अद्याप आटले नसताना पुन्हा पावसाला सुरूवात झाल्याने आता शेतकर्‍यांच्या तोंडचे पाणी पळण्याची वेळ आली आहे.

दरम्यान, गेल्या दोन महिन्यांत झालेल्या अतिरिक्त पावसाने नुकसान झालेल्या पिकांच्या पंचनाम्याला कृषी आणि महसूल विभागाने सुरूवात केली आहे.

नगर जिल्हा रब्बी हंगामाचा जिल्हा हा परतीच्या पावसावर जिल्ह्यातील शेती अवलंबून आहे. सुरूवातीच्या टप्प्यात घाटमाथ्यावर पडणार्‍या पावसामुळे जिल्ह्यासाठी वरदान असणार्‍या मुळा, भंडारदरा आणि निळवंडे धरण भरत असते.

मात्र, यंदा गेल्या दोन महिने सलग पाऊस पडत आहे. आता कुठे आठ ते दहा दिवस पावसाने उघडीप दिली होती. मात्र, शेतातील पावसाने अद्याप आटलेले नसल्याने रब्बी हंगामाासाठी अद्याप पेरण्या सुरू झालेल्या नाहीत. जिल्ह्यात अनेक भागात विशेष करून गोकुळ अष्टीनंतर ज्वारीच्या पेरण्याला सुरूवात होत असते.

यंदा पावसामुळे या पेरण्या होवू शकलेल्या नाहीत. यंदा रब्बी हंगामातील ज्वारीच्या पेरण्या साधारणपणे 15 दिवस ते महिनाभर लेट झाल्या आहेत. त्यात आता पुन्हा पाऊस सुरू झाल्याने रब्बीसाठी पोषक (पान 4 वर)वातावरण असतांनाही जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी कृषी विभागाच्या नियोजनानूसार पेरण्या पुर्ण होती की नाही, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

आतापर्यंत जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी असणार्‍या सरासरी 7 लाख 26 हजार हेक्टर क्षेत्रापैकी अवघ्या 2 हजार हेक्टरवर पेरण्या झाल्या असून पेरण्याची टक्केवारी ही शुन्यांच्या खाली असल्याचे कृषी विभागाच्या अहवालावरून समोर आले आहे. जिल्ह्यात ज्वारी पिकाशिवाय अन्य कोणत्याच पिकाची पेरणी झालेली नाही. पाऊस चांगला झाल्याने आतापर्यंत ऊस आणि कांदा पिकाच्या लागवडी सुरू असून पडणार्‍या पावसामुळे कांदा पिक अडचणीत आले आहे.

पावसाचा जोर वाढणार

हवामान विभागाच्या माहितीनूसार पुढील काही दिवस जिल्ह्यात मोठ्या पावसाचा इशारा दिला आहे. यामुळे रब्बी हंगामासाठी शेतीची मशागत आणि रान तयार करण्यासाठी वापसा मिळण्यास उशीर होणार आहे. यामुळे शेतकर्‍यांची अडचण होणार आहे. वापसा झाल्यानंतर महिनाभरात थंडीची चाहूल लागल्यानंतर गहू आणि हरभरा पिकाची पेरणी सुरू होणार आहे.

पाच हजार हेक्टरवर कांदा लागवड

आतापर्यंत जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यांत नव्याने 4 हजार 700 हेक्टर क्षेत्रावर लाल कांदा पिकाची लागवड झालेली असून पावसाने रोप शिल्लक नसल्याने लाला कांदा पिकाचे रोपांचे दर हे गगनाला भिडलेले आहेत. यासह गावरान कांदा पिकाचे बियाणे दर हे सर्वोच्च असून शेतकर्‍यांची कांदा बियाणे आणि रोपासाठी वणवण होताना दिसत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com