IPL-2021 : पंजाबचा बंगळुरूवर विजय

अहमदाबाद । वृत्तसंस्था

सुरुवातीच्या सहा सामन्यांत पाच विजय मिळवणार्‍या आरसीबीला दुसरा पराभवाचा धक्का बसला. पंजाब किंग्सचा हरप्रीत ब्रार हा गेम चेंजर ठरला. त्यानं दोन षटकांत विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल व एबी डिव्हिलियर्स या आरसीबीच्या तीन प्रमुख फलंदाजांना माघारी पाठवले अन् सामना पंजाब किंग्सच्या पारड्यात पडला. हरप्रीतने फलंदाजीतही कर्णधार लोकेश राहुलसोबत अर्धशतकी भागीदारी केली.

आयपीएल 2021मध्ये कामगिरीत सातत्य राखण्यात अपयशी ठरलेल्या पंजाब किंग्सच्या फलंदाजांनी आजही निराश केले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या गोलंदाजांची लोकेश राहुल व ख्रिस गेल यांची पिसे उपटली, परंतु गेल बाद झाला अन् पंजाब किंग्सच्या फलंदाजांनी तंबूत परतण्याच्या रांगा लावल्या. कर्णधार राहुल एकाबाजून खिंड लढवत होता. पण, त्याला अन्य फलंदाजांकडून साथ मिळाली नाही. हरप्रीत ब्रारने अखेरच्या षटकांत थोडी फार फटकेबाजी करून पंजाब किंग्सला समाधानकारक पल्ला उभारून दिला. गेल 24 चेंडूंत 6 चौकार व 2 षटकारांसह 46 धावांवर माघारी परतला.

लोकेशनं 35 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले, परंतु निकोलस पूरन ( 0) पुन्हा अपयशी ठरला. यंदाच्या आयपीएलमध्ये तो चौथ्यांदा शून्यावर बाद झाला आहे. लोकेश व हरप्रीत ब्रार यांनी सहाव्या विकेटसाठी 32 चेंडूंत 61 धावांची भागीदारी केली. लोकेश 57 चेंडूंत 7 चौकार व 5 षटकारांसह 91 धावांवर नाबाद राहिला. पंजाब किंग्सने 5 बाद 179 धावा केल्या. ब्रार 25 धावांवर नाबाद राहिला.

प्रत्युत्तरात, देवदत्त पडीक्कलने खणखणीत षटकार मारून इरादे स्पष्ट केले, परंतु रिली मेरेडीथ याने त्याचा त्रिफळा उडवला. कर्णधार विराट कोहली व रजत पाटीदार यांनी दुसर्‍या विकेटसाठी 41 धावांची भागीदारी करून डाव सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु आजच्या सामन्यात संधी मिळालेल्या हरप्रीत ब्रारने कमाल केली. त्याने 11व्या षटकात सलग दोन चेंडूंत विराट ( 35) व ग्लेन मॅक्सवेल ( 0) यांना बाद केले. आरसीबीसाठी हे धक्के कमी होते की काय, ब्रारनें पुढील षटकात एबी डिव्हिलियर्सचा ( 3) अडथळा सहज दूर केला. ब्रारने 4 षटकांत 1 निर्धाव षटक 19 धावा अन् 3 विकेट्स घेतल्या. ब्रारच्या गोलंदाजीवर पुढे येऊन मारण्याच्या प्रयत्नात विराट त्रिफळाचीत झाला. चेंडू खालीच राहिला होता. मॅक्सवेलला काही कळण्यापूर्वीच ब्रारने टाकलेल्या चेंडूने त्याच्या त्रिफळा उडवला होता.

या धक्क्यानंतर आरसीबीला सावरणे अवघड झाले. शाहबाज अहमद व रजत पाटीदार हे फलंदाजही माघारी फिरले. पंजाबनें हा सामना 34 धावांनी जिंकून प्ले ऑफच्या आशा अजूनही जिवंत ठेवल्या आहेत. आरसीबीला 8 बाद 145 धावांवर समाधान मानावे लागले. रवी बिश्नोईनेही 4 षटकांत 17 धावांत 2 विकेट्स घेतल्या. हर्षल पटेल 13 धावांत 31 ( 3 चौकार व 2 षटकार) धावांवर बाद झाला. बिश्नोईने त्याचा अफलातून झेल टिपला.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *