नाशिक | प्रतिनिधी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची प्रथम वर्ष सत्र परीक्षा फेब्रवारीच्या अखेरीस घेण्याबाबत पडताळणी सुरू असून, या परीक्षा वेळेत पार पाडण्यासाठी ऑनलाइन पद्धतीला प्राधान्य देण्यात येणार आहे. ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेताना, त्यात एमसीक्यू आणि विस्तृत स्वरूपातील प्रश्न विचारण्यात येण्याची शक्यता आहे...

विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांची प्रक्रिया संपली असून, निकालही जाहीर झाले आहेत. व्यावसायिक अभ्यासक्रम वगळल्यास इतर पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाली असून, नव्या वर्षालाही सुरुवात झाली आहे. त्यामुळे प्रथम वर्षासह प्रवेशित जुन्या विद्यार्थ्यांच्या सत्र परीक्षा कधी होतील, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या पुणे, नगर, नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या पारंपरिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. करोनाच्या प्रादुर्भावामुळे ऑनलाइन शिक्षण पद्धतीद्वारे पाठ्यक्रमही पूर्ण झाला आहे.

याचमुळे पुणे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडून फेब्रुवारीअखेरीस परीक्षा घेण्याची चाचपणी सुरू आहे. परीक्षा कमी कालावधीत होऊन, निकालाही वेळेत जाहीर होण्यासाठी सत्र परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. लेखी परीक्षा एमसीक्यू आणि विस्तृत स्वरूपातील प्रश्नाधारित राहणार आहे.

त्यामुळे निकाल कमी कालावधीत लावणे शक्य होणार आहे. शैक्षणिक वर्षाची विस्कटलेली घडी बसवण्यासही मदत होणार आहे. परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडून सत्र परीक्षांचे नियोजन करण्यात येत आहे. त्यानुसार परीक्षा विनाअडथळा पार पडण्यासोबतच विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचाऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही, याची काळजी घेण्यात येत आहे.

येत्या काही दिवसांत सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असे समजते.

सत्र परीक्षांचे प्रस्तावित नियोजन

जानेवारी - अर्ज भरण्याची प्रक्रिया

फेब्रुवारीअखेरीस - परीक्षांना सुरुवात

मार्च - परीक्षा पूर्ण होणे

एप्रिल - निकाल जाहीर होणे