
पुणे | Pune
ड्रग्जमाफिया ललित पाटील प्रकरणातील मोठी अपडेट समोर आली असून पुणे पोलिसांनी नाशिकमधून दोन महिलांना ताब्यात घेतले आहे. या दोघी ललितच्या मैत्रिणी असल्याची माहिती मिळत आहे. ससून रुग्णालयातून ललितला पळून जाण्यासाठी या महिलांनी मदत केल्याचे समजते.
प्रज्ञा कांबळे आणि अर्चना निकम अशी या दोघींची नावे आहेत. ललित पाटील हा फरार असताना सातत्याने या दोन्ही महिलांच्या संपर्कात असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. मुंबई पोलिसांनी बुधवारी ललितला ताब्यात घेतल्यानंतर पुणे पोलिसांनी याप्रकरणी झपाट्याने तपास करण्यास सुरुवात केली.
पोलिसांनी रात्री नाशिक शहरातून दोन महिलांना अटक केली आहे. पुणे न्यायलायात आज दोघींना हजर केले जाणार आहे. ललित पाटील हा फरार असताना नाशिकमध्ये या दोन्ही महिलांना भेटला होता. त्याने या महिलांकडून पैसे घेतले होते.
पुढे त्याला राहण्यासाठी आणि श्रीलंकेला पळून जाण्यासाठी या महिला त्याला मदत करत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे. दरम्यान, ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटीललादेखील पोलिसांनी ड्रग्ज प्रकरणात ताब्यात घेतले आहे.
नाशिकच्या महिलेकडून २५ लाख घेतले अन्...
ड्रग्ज माफिया ललित पाटील याला पोलिसांनी नुकतीच अटक केली केली. अटकेपूर्वी पुण्यातील ससून रुग्णालयातून ललित पाटील फरार झाला होता. यानंतर तो आधी नाशिकला आला. नाशिकमधून एका महिलेकडून त्याला २५ लाख रुपये पुरविले गेले. ही २५ लाखांची रक्कम घेऊन तो राज्याबाहेर फरार झाला, असे पोलीस तपासात समोर आले आहे....
ललित पाटील याला मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर नाशिक पोलिसांनी विविध पोलिस ठाण्यांत दाखल असलेल्या ‘एमडी’ या अमली पदार्थाच्या गुन्ह्यातील तपासाला गती दिली. पाटीलचे ‘एमडी’ पोचविण्यात सहभाग असलेल्या संशयितांसह त्याला आर्थिक रसद पुरविण्यात सहभाग असल्याच्या संशयावरून एका महिलेला ताब्यात घेत तिच्याकडून ७ किलो चांदी हस्तगत केली. या महिलेवर ललितला २५ लाख रुपये दिल्याचा पोलिसांचा आरोप आहे. पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक आयुक्त डॉ. सीताराम कोल्हे यांनी ही माहिती दिली.