Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याभगवान ऋषभदेव महामस्तकाभिषेक सोहळ्याच्या पत्रिकेचे प्रकाशन

भगवान ऋषभदेव महामस्तकाभिषेक सोहळ्याच्या पत्रिकेचे प्रकाशन

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

मांगीतुंगी ( Mangitungi ) येथे भगवान ऋषभदेव यांच्या 108 फूट मूर्तीचा महामस्तकाभिषेक महोत्सव (Mahamastakabhishek Mahotsav of 108 feet idol of Lord Rishabhdev )दि. 15 ते 30 जून या कालावधीत होणार आहे.

- Advertisement -

या महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणांनी समन्वयाने व जलदगतीने आवश्यक ती सर्व कामे वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देश जिल्हा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिले.यावेळी भगवान ऋषभदेवांच्या 108 फूट मूर्ती महामस्तकाभिषेक महोत्सव पत्रिकेचे विमोचन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.श्रीक्षेत्र मांगीतुंगी येथील भगवान ऋषभदेव मूर्ती निर्माण कमिटी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ना. भुजबळ बोलत होते.

यावेळी आ. दिलीप बोरसे, जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड, अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे, जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, प्रांत बबन काकडे, बागलाणचे तहसीलदार जितेंद्र इंगळे, गटविकास अधिकारी पांडुरंग कोल्हे, महावितरण अभियंता अनिल बोंडे, माजी आ. दीपिका चव्हाण, संजय चव्हाण, भिलवाड सरपंच गुलाबबाई गावित, ऋषभदेव मूर्ती निर्माण कमिटीचे पीठाधीश रवींद्रकीर्ती स्वामीजी, महामंत्री संजय पापडीवाल, अधिष्ठाता सी.आर. पाटील, कोषाध्यक्ष प्रमोद कासलीवाल, कार्याध्यक्ष अनिल जैन, भूषण कासलीवाल, जीवनप्रकाश जैन, सुमेरकुमार काले, अ‍ॅड. रवींद्र पगार, महेंद्र काले, राजेंद्र कासलीवाल आदी उपस्थित होते.

महामस्तकाभिषेक सोहळ्यासाठी स्थानिक व बाहेरील शहरातून भाविक मोठ्या संख्येने येणार आहेत. त्यासाठी महामार्गावरील दिशादर्शक फलकांची दुरूस्ती व आवश्यक ठिकाणी नवीन दिशादर्शक फलक त्वरीत लावण्यात यावेत. महोत्सव काळात डोंगरावर मूर्तीच्या ठिकाणी पोहचण्यासाठी असलेल्या उद्वाहक यंत्रणा अखंडीत सुरू राहण्यासाठी, त्याचप्रमाणे रात्रीच्या वेळी येणार्‍या भाविकांसाठी पथदीपांची व्यवस्था करावी. त्यासाठी मुबलक प्रमाणात वीज उपलब्ध होणे आवश्यक असून महावितरण अधिकार्‍यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाशी समन्वय साधून या गोष्टी प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी भुजबळ यांनी दिल्या.

ते पुढे म्हणाले की, महोत्सव काळात डोंगरावरील मूर्तीच्या ठिकाणी हरणबारी धरणातून पाणी उचलण्यासाठी पाण्याच्या पाईपलाईनची वेळेत दुरूस्ती व कायमस्वरूपी जोडणी करण्यात यावी. याबाबत कायमस्वरूपी उपाययोजना केल्यास यात्रा कालावधी संपल्यानंतर देखील स्थानिक गावांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल. त्यादृष्टीने कार्योत्तर मंजुरीसाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना त्यांनी संबधित यंत्रणेला दिल्या. महोत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस यंत्रणेने सतर्क राहून चोख बंदोबस्ताची व्यवस्था करावी.

गरजेनुसार वाढीव मनुष्यबळ व होमगार्डस्ची सेवा घेण्यात यावी, असेही भुजबळांनी सूचित केले. महात्सव काळात आरोग्य यंत्रणांनी रूग्णवाहिका, डॉक्टर्स, परिचारिका व औषधांची सुसज्ज व्यवस्था ठेवावी. स्वच्छतेच्या दृष्टीने जंतुनाशक औषधांची फवारणी, फिरते शौचालय आदी व्यवस्था करावी. पुढील बैठकीपूर्वी सर्व यंत्रणांनी वेळेत कामे पूर्ण करावीत अन्यथा जबाबदारी निश्चित करण्यात येईल, असा इशाराही भुजबळ यांनी दिला. भुजबळ यांनी येथे पाहणी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या