राज्याच्या अर्थसंकल्पात जनतेचा सहभाग

फडणवीस यांनी मागविल्या सूचना
राज्याच्या अर्थसंकल्पात जनतेचा सहभाग

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

सलग पाच वर्ष राज्याचे मुख्यमंत्रिपद भूषविलेले देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis )हे वित्त मंत्री या नात्याने प्रथमच यंदा राज्याचा सन २०२३-२४ या वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. येत्या २७ फेब्रुवारीपासुन सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थसंकल्प (State Budget- 2023-24)मांडला जाईल. त्यानिमित्ताने त्यांनी एक अनोखा प्रयोग राबवायचे ठरवले आहे. त्यानुसार अर्थसंकल्पासाठी फडणवीस यांनी थेट जनतेमधूनच सूचना आणि संकल्पना मागवल्या आहेत. यासंदर्भात त्यांनी ट्वीट करीत जनतेला सूचना पाठविण्याचे आवाहन केले आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदारांना योग्य वेळेत आपले प्रश्न, लक्षवेधी सूचना तसेच प्रस्ताव ऑनलाईन पाठविण्याच्या सूचना विधिमंडळाकडून पाठविण्यात आल्या आहेत. विधानभवनातून मिळालेल्या माहितीनुसार विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातील आमदारांना आपले प्रश्न वेळेत पाठवावेत याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

हे प्रश्न आल्यानंतर त्याची विभागवार यादी करण्यात येईल. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये अधिवेशनाचा निश्चित कालावधी ठरविण्यात येईल. मात्र, अर्थसंकल्पीय अधिवेशन किमान तीन आठवडे चालणार असल्याचे समजते. शिंदे सरकारमधील पालकमंत्री यांनी आपापल्या जिल्ह्याच्या मागण्या विचारता घेऊन त्यानुसार वार्षिक आराखडा तयार केला असून तो अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. त्याचा विचार अर्थसंकल्पात करण्यात येणार आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंत मुख्यमंत्री, गृहमंत्री, विरोधी पक्षनेता, उपमुख्यमंत्री अशी पदे भूषविली आहेत. पण, अर्थमंत्री म्हणून त्यांचा हा पहिला अर्थसंकल्प असणार आहे. आमदार असताना त्यांनी ‘अर्थसंकल्प कसा वाचावा’ हे पुस्तक लिहिले आहे. अर्थसंकल्पावर अनेक व्याख्यानेही त्यांनी दिली आहेत. मात्र, यंदा अर्थसंकल्प मांडताना त्यांनी राज्यातील जनतेला आवाहन केले आहे. आपल्या पहिल्या अर्थसंकल्पात जनतेच्या सूचना असाव्यात म्हणून त्यांनी थेट जनतेच्या सूचना आणि संकल्पना मागविल्या आहेत.

सर्वसामान्य जनतेला आपल्या संकल्पना मांडण्यासाठी http://bit.ly/MahaBudget23 हे संकेतस्थळही उपलब्ध करून देण्यात आले आहे. यापूर्वी, तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प तयार करण्यापूर्वी जनतेकडून सूचना मागवल्या होत्या. त्यावेळी प्राप्त झालेल्या अनेक सूचना व्यवहार्य नसल्याने हा प्रयोग फारसा यशस्वी झाला नव्हता.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com