निधीवाटपाचा वस्तुनिष्ठ अहवाल द्या

विभागीय आयुक्तांचे जिल्हाधिकारी कार्यालयास पत्र
निधीवाटपाचा वस्तुनिष्ठ अहवाल द्या

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्हा नियोजन समितीने 2022-2023 या वर्षात बचत झालेल्या निधीचे पुनर्विनियोजन करताना जिल्हा परिषदेला कामांच्या केवळ 10 टक्के निधी दिला. जिल्हा नियोजन समितीने पुनर्विनियोजन करताना नियमांचे पालन केले नसल्यामुळे हे नियोजन रद्द करून त्याची जबाबदारी निश्चित करावी, असे पत्र माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले होते. यामुळे विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकारी कार्यालयास पत्र पाठवून, जिल्हा नियोजन समितीने पुनर्विनियोजनात निधी वाटपाचा वस्तुनिष्ठ अहवाल मागवला आहे.

जिल्हा वार्षिक योजनेतून मिळणारा निधी खर्च करण्यासाठी जिल्हा परिषदेला दोन वर्षांची मुदत असते. इतर कार्यान्वयीन यंत्रणांना केवळ वर्षभराची मुदत असते. यामुळे या यंत्रणांना अखर्चित अथवा बचत झालेला निधी मार्च अखेरीस जिल्हा नियोजन समितीकडे वर्ग केला जातो. बचत झालेला निधी परत पाठवण्याऐवजी जिल्हा नियोजन समिती त्याचे पुनर्विनियोजन करून तो जिल्हा परिषदेच्या संबंधित विभागांकडे वर्ग करते. यासाठी जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष असलेल्या पालकमंत्र्याची पूर्वपरवानगी घेतली जाते.

यावर्षी बचत झालेला निधी मोठ्या प्रमाणावर पुनर्विनियोजनासाठी उपलब्ध राहील, असे गृहित धरून जिल्हाधिकार्‍यांनी जिल्हा परिषदेला पत्र पाठवून अधिकाधिक कामांना प्रशासकीय मान्यता देऊन त्यांचे प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीला पाठवण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या बांधकाम, शिक्षण, आरोग्य, महिला व बालविकास, ग्रामपंंचायत आदी विभागांनी मोठ्याप्रमाणावर कामांना प्रशासकीय मान्यता देऊन त्याचे प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे पाठवले.

मात्र, सरकारने यावर्षी बचत झालेल्या निधीतील बहुतांश रक्कम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेकडे वळवण्याचा निर्णय घेतल्यामुळे 60 कोटी रुपये बचत झालेल्या निधीतील 52 कोटी रुपये निधी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेकडे वळवण्यात आला. जिल्हा परिषदेला देण्यासाठी केवळ 8 कोटी रुपये निधी शिल्लक राहिला. त्यातील काही निधी शाळा वर्गखोल्या व अंगणवाडी यांच्यासाठी दिला.यामुळे जिल्हा नियोजन समितीकडे आलेल्या प्रशासकीय मान्यतेच्या प्रस्तावांना अगदी अल्प म्हणजे दहा टक्के निधी बीडीएस यंत्रणेवरून वितररित केला आहे.

जिल्हा नियोजन समितीने विद्यमान पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार केलेले पुनर्विनियोजनाला माजी पालकमंत्र्यांनी आक्षेप घेतल्याने विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयास पत्र पाठवून या निधी पुनर्विनियोजनाचा वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

नववर्षातील कामांवर परिणाम

जिल्हा नियोजन समितीने पुनर्विनियोजन करताना कामांना प्रशासकीय मान्यता रकमेएवढा निधी देणे गरजेचे असताना केवळ 10 टक्के निधी वितरण केले आहे. या अनियमिततेची चौकशी करण्याची करण्याची मागणी येवल्याचे आमदार छगन भुजबळ यांनी विभागीय आयुक्तांकडे केली. बचत निधीच्या दहापट जास्त कामे मंजूर केल्याने नवीन वर्षातील कामांवर याचा परिणाम होणार आहे. या प्रकारामुळे 2023- 24 या आर्थिक वर्षत दायित्व मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याने नवीन कामांना वाव राहणार नाही. यामुळे जबाबदारी निश्चित करण्याची त्यांनी मागणी केली होती.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com