नाशिक । प्रतिनिधी Nashik
नाशिक महानगरातील वाढत्या लोकवस्तीचा विचार करून मनपाने रुग्णालयांचे विकेंद्रीकरण करण्यास सुरुवात केली असून नवीन नाशिक व पंचवटीत महापालिकेच्या वतीने सुमारे दोनशे खाटांचे दोन स्वतंत्र रुग्णालय उभारण्याच्या दृष्टीने नियोजन केले जात आहे.
पंचवटीतील पेठरोड, दिंडोरी रोड, रामवाडी, मखमलाबाद तसेच जुने नाशिक व मध्य नाशिकमधील रुग्णांना सोयीचे ठरेल असे मखमलाबाद नाक्यावर असलेल्या पंचवटीच्या जुन्या विभागीय कार्यालयाच्या जागेवर चार मजली रुग्णालय उभारण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. मखमलाबाद नाक्यावर असलेले मनपाचे जुने विभागीय कार्यालय, तसेच शेजारील भंडार विभागाच्या जागेवर हे रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे.
माजी नगरसेवक गुरुमित बग्गा व वास्तुविशारद यांनी महापालिकेचे शहर अभियंता सुरेश वंजारी यांच्या समवेत सलग दोन दिवस सविस्तर चर्चा करून
प्रस्ताव तयार करण्याच्या कामाला गती दिली आहे. राज्य सरकारच्या वैद्यकीय विभागाकडून या रुग्णालयासाठी निधी मागण्यात येणार आहे. तीन वर्षांवर सिंहस्थ कुंभमेळा येऊन ठेपला असून त्यापूर्वी जर रुग्णालयाचे बांधकाम पूर्ण झाले तर त्याचा फायदा कुंभमेळ्यात येणार्या भाविकांसाठी होऊ शकतो. या रुग्णालयाच्या बांधकामाला लागणारा कोट्यवधी रुपयांचा खर्च शासनाने उचलावा व त्यांच्या माध्यमातूनच रुग्णालय चालवण्याची सूचनाही मनपा गोटात चर्चिली जात होती.
यासंदर्भातील कार्यवाही लवकरात लवकर झाल्यास येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शहरातील लोकप्रतिनिधींमार्फत प्रयत्न करून शासनाकडून निधी मागवण्यासाठी प्रयत्न करता येणार आहे.