
नवी दिल्ली । वृत्तसंस्था New Delhi
केंद्र सरकारने सैन्य आणि इतर क्षेत्रांमध्ये महिलांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक उपाय राबविले आहेत. त्याच अनुषंगाने 2024 च्या प्रजासत्ताकदिनी दिल्लीत परेड, मार्च पास्ट आणि सादरीकरण यामध्ये पूर्णपणे महिलांचा सहभाग असेल. संरक्षण मंत्रालयाने यासंबंधीचे आदेश काढले आहेत.
सूत्रांनी सांगितले की, संरक्षण मंत्रालयाने 2024 च्या परेडच्या योजनेवर तिन्ही सेना, विविध मंत्रालये आणि विभागांना कार्यालयीन पत्र पाठवले आहे.
सूत्रांनी सांगितले की, अशा प्रस्तावाचा विचार करण्यात आला असून फेब्रुवारीच्या सुरुवातीला संरक्षण सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक डी-ब्रीफिंग बैठक घेण्यात आली होती. निवेदनात म्हटले आहे की, विचारविनिमय केल्यानंतर पुढील वर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्य पथावर आयोजित करण्यात येणार्या परेडमधील तुकड्यांमध्ये (मार्चिंग आणि बँड), झांकी आणि इतर प्रदर्शनांमध्ये फक्त महिलाच सहभागी होतील, असा निर्णय घेण्यात आला. महिलांना प्रोत्साहन देण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणामुळे महिला वायू दलामध्ये फायटर पायलट पदापर्यंत पोहोचत आहेत. तसेच, जवानांच्या रुपात महिला सहभागी होत आहेत, त्यातूनच लष्कराने महिला अधिकार्यांसाठी आर्टिलरी रेजिमेंट सुरु केली आहे.
महिलांचा दबदबा
लष्कराच्या म्हणण्यानुसार, कर्नल गीता राणा ह्या चीनच्या सीमेला लागून असलेल्या संवेदनशील लडाख प्रदेशात स्वतंत्र युनिटचे नेतृत्व करणार्या पहिल्या महिला लष्करी अधिकारी ठरल्या आहेत. याशिवाय पहिल्यांदाच लष्कराने महिला अधिकारी कॅप्टन शिवा चौहाण यांना जगातील सर्वात उंच आणि सर्वात थंड सियाचीनमध्ये तैनात केले आहे. लष्कराने सुदानमधील अबेई या विवादित प्रदेशात 27 महिला शांतीरक्षकांची सर्वात मोठी तुकडीही तैनात केली आहे.