Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्या'रासाका' सुरू होण्याच्या हालचाली गतिमान

‘रासाका’ सुरू होण्याच्या हालचाली गतिमान

निफाड । प्रतिनिधी Niphad

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत प्रचाराच्या केंद्रस्थानी राहिलेला रासाका सुरू होण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला असून शासनाने 15 वर्षासाठी हा कारखाना भाडेतत्वावर सुरू करण्यासाठीची निविदा रविवारी प्रसिद्ध केली असून सक्षम सहकारी संस्थांना हा कारखाना भाडेतत्वावर घेता येईल असा बदल राज्य शासनाने कायद्यात केल्याने आता आमदार दिलीप बनकर हे पिंपळगाव बाजार समिती, स्व. अशोकराव बनकर पतसंस्था व भिमाशंकर अ‍ॅग्रो प्रॉडक्ट या संस्थेमार्फत निविदा भरण्याची व या हंगामात कारखाना चालू करण्याची शक्यता आहे. रासाकाची निविदा प्रसिद्ध झाल्याने ऊस उत्पादक शेतकर्‍यांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे.

- Advertisement -

गेल्या आठ वर्षांपूर्वी निसाका वाढत्या कर्जामुळे बंद पडला. आज या कारखान्यावरील कर्ज 350 कोटींच्या पुढे गेले आहे. तर रानवड कारखान्याचा बॉयलर प्रतिपादन सोहळा दोन वर्षापासून होऊ शकला नाही. निसाका बंद असल्याने रानवड हाच ऊस उत्पादकांसाठी आधारवड होता. स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या वैद्यनाथ त्यानंतर हरिभाऊ बागडे यांच्या छत्रपती संभाजीराजे उद्योग समूह आदी संस्थांनी रासाका चालविण्याचा प्रयत्न केला. परंतू त्यांनी अर्ध्यावर करार सोडून व शेतकरी कामगारांची देणी थकवत धूम ठोकली. रासाका भाडेतत्वावर देणे शक्य असूनही शासनाकडून वेळोवेळी होणारी दिरंगाई यामुळे शेतकर्‍यांमध्ये निराशेचे वातावरण तयार झाले होते.

मात्र मागील विधानसभा निवडणूकीत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिलीप बनकरांना आमदार करा मी कारखाना सुरू करुन दाखवतो असे भावनिक आवाहन शेतकर्‍यांना केले होते. साहजिकच बोलेल ते करुन दाखविणार्‍या अजित पवारांवर शेतकर्‍यांनी विश्वास ठेवत दिलीप बनकरांना आमदार केले. तर आमदार दिलीप बनकरांनी देखील आपले राजकीय वजन वापरत सहकार मंत्र्यांशी बैठक घेत सहकारी संस्थांना साखर कारखाने भाडेतत्वावर घेता येतील असे कायद्यात रुपांतर करुन घेतले. त्यानंतर आमदार बनकरांनी साखर आयुक्त, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सहकार मंत्री, पालकमंत्री यांची वेळोवेळी भेट घेऊन रासाका सुरू करण्याबाबत प्रयत्न चालविले. मात्र वर्षभराचा कालावधी उलटून देखील शासन स्तरावरुन कारखाने चालू होण्याबाबत हालचाली होत नसल्याने विरोधकांनी आमदार बनकरांवर टिकेची झोड उठवली.

परंतू आ. बनकरांनी त्याला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न न करता रासाका बाबत आपले प्रयत्न सुरुच ठेवले. अखेरीस रविवार दि.20 डिसेंबर रोजी रासाकाची भाडेतत्वावर देण्याची निविदा दैनिकांमध्ये प्रसिद्ध झाली अन् ऊस उत्पादक शेतकर्‍यांना आशेचा किरण दिसू लागला. तर आमदार बनकरांनी देखील आश्वासनांची पूर्तता केल्याची चर्चा तालुक्यात होऊ लागली. त्याबाबतचे संदेश सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले. सद्यस्थितीत ऊस तोडणीचा हंगाम निम्मा संपत आला आहे. तर 11 जानेवारीला निविदा उघडून रासाका कोणत्या संस्थेला द्यावयाचा याचा निर्णय होणार आहे. त्यात आमदार दिलीप बनकर हे त्यांच्या ताब्यात असलेल्या तीनही संस्थांमार्फत निविदा भरणार असल्याने व स्वत: सत्ताधारी पक्षाचे आमदार असल्याने रासाकाची सूत्रे पुढील 15 वर्ष आमदार दिलीप बनकरांच्या ताब्यात राहण्याची शक्यता आहे.

सध्या रासाकाची ऊस गाळप क्षमता प्रतिदिन 1250 मे. टन असून हा कारखाना चालविणे म्हणजे मोठे अग्निदिव्य ठरणार आहे. कारण वैद्यनाथ, छत्रपती उद्योग समूह अशा बड्या उद्योजकांनी या कारखान्याबाबत गुडघे टेकवले. त्यातच यावर्षी शेवटच्या टप्प्यात हा कारखाना सुरू होत असल्याने व आता अवघा 2 हजार हेक्टर क्षेत्रावर ऊस शिल्लक असल्याने ऊस मिळविण्याच्या स्पर्धेबरोबरच कामगार, ऊस वाहतुकीसाठी वाहने, यंत्रसामुग्री दुरुस्ती अशी आव्हाने पेलावी लागणार असनू यात आ. बनकर यशस्वी झाले तर त्या माध्यमातून निफाडचे राजकारणावरील पकड अधिक मजबूत करण्यात बनकर यशस्वी होतील यात शंकाच नाही. तसेच गेल्या काही वर्षापासून सुनसान असलेला हा परिसर पुन्हा गजबजणार असल्याने कामगार, शेतकर्‍यांमध्ये उत्साह पसरला आहे.

ऊस उत्पादक शेतकर्‍यांचे संकट दूर होण्यास मदत

राज्यातील बंद पडलेली कारखाने तालुक्यातील आर्थिक सक्षम संस्थांना चालविण्यास घेता यावे यासाठी सहकार कायद्यात बदल करावे लागले. शासनस्तरावरुन तसे बदल करुन घेतले. तालुक्यातील बंद पडलेले कारखाने चालू व्हावे यासाठी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. कारखाना भाडेतत्वावर दिल्यानंतर किती येणे बाकी होती व पुढे किती कालावधीसाठी भाडेतत्वावर दिल्यास कारखान्याची देणी पूर्ण होतील आदींची माहिती घेतल्यानंतर सदरच्या समितीने कारखाना भाडेतत्वावर देण्यास परवानगी दिली व आपण केलेल्या पाठपुराव्याला यश आले.

त्यासाठी राष्ट्रवादीचे संस्थापक शरदचंद्र पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, पालकमंत्री छगन भुजबळ, समितीचे सदस्य ना. शंभूराजे देसाई, ना. विश्वजित कदम, साखर आयुक्त शेखर गायकवाड यांचेसह विविध अधिकार्‍यांनी वेळोवेळी सहकार्य केल्यानेच आज रविवार चंपाषष्टी महाराष्ट्राचे आराध्य दैवत खंडेराव महाराज यांच्या यात्रोत्सवाच्या दिवशी रासाकाची निविदा प्रसिद्ध झाली. त्यामुळे गेल्या काही वर्षापासून ऊस उत्पादक शेतकर्‍यांसमोर असलेले संकट निश्चितच दूर होईल.

आ. दिलीप बनकर (विधानसभा सदस्य)

- Advertisment -

ताज्या बातम्या