तिप्पट भाडे आकारात खासगी व्यावसायिकांकडून लूट

तिप्पट भाडे  आकारात खासगी व्यावसायिकांकडून लूट

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

राज्यात एसटी कर्मचार्‍यांच्या (ST Workers ) काही ठिकाणी सुरू असलेल्या संपाचे लोण आता नाशिकमध्येही (Nashik) पसरले आहे. शहरातील जवळपास सर्वच आगारांतील बससेवा (Bus service) बंद झाल्याने दिवाळीच्या निमित्ताने (Diwali) गावाकडे जाणार्‍या आणि येणार्‍या प्रवाशांच्या (passengers) खिशाला चांगलीच कात्री लागली...

संप कधी संपेल, याबाबत अनिश्चितता असल्यामुळे बसेस सुरु होण्याची वाट न पाहता अनेकांनी मिळेल त्या वाहनाने आणि मागतील त्या भाड्याने आज प्रवास करणे पसंत केले. एकूणच बससेवा ठप्प झाल्याने एकीकडे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. तर दुसरीकडे एसटी महामंडळालाही मोठा आर्थिक फटका बसत आहे.

आज नाशिक शहरातील पेठ रोड वर्कशॉप, पंचवटी डेपो, विभागीय नियंत्रक कार्यालय, महामार्ग बस स्थानक, जुने सीबीएस परिसरात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे (MSRTC) राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे, या प्रमुख मागणीसाठी कर्मचारी उपोषणाला (Agitation) बसले होते.

एकीकडे एसटी थांबली असताना खासगी बसेसचे प्रवासीभाडे जवळपास तिप्पट झाले होते. टोल नाक्यांचे कारण देत अनेक खासगी व्यावसायिकांनी अतिरिक्त पैसे प्रवाशांकडून उकळले. अनेकांना पर्याय नसल्याने त्यांनी खासगी वाहतुकीचा आधार घेतला. त्यामुळे खासगी वाहतूकदारांची दिवाळी झाली.तर काहींनी प्रवासभाडे कितीतरी अधिक असल्याने आपला प्रवासच रद्द केला.

दरम्यान, नाशिकला दिवाळीच्या निमित्ताने आलेल्या ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांचे अतोनात हाल झाले. जे खासगी वाहन मिळेल त्याने गाव गाठायचे हे एकच लक्ष्य मुंबई आग्रा महामार्गावर बसची वाट पाहणार्‍या नागरिकांच्या मनी ठाम होते.

बळी मंदिर परिसरात एक बागलाण तालुक्यातील दुंधे तळवाडे येथील आजोबा म्हणाले की, मुलाकडे दिवाळीसाठी आलो होतो. शेतकर्‍याची कामे कधीही संपत नाहीत. कालही (दि 07) रोजी सकाळपासून इथे आलो होतो. मात्र, बस मिळाली नाही म्हणून परत घरी गेलो. पण, शेतात कामे आहेत म्हणून आज काही करून घर गाठावे लागणार आहे.

तेवढ्यात एक नाशिकमधील वाहन कंपनीची गाडी याठिकाणी आली. या व्यक्तीने पटकन मालेगाव पर्यंत यायचे आहे म्हणत गाडीवर जागा मिळवली. यावेळी चालकाने एवढे भाडे लागेल असे सांगतात या व्यक्तीने सांगितले कितीही घे पण मला मालेगावला सोड...असे सांगून मिळेल त्या वाहनाने गावाकडे कूच केली.

दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या आहेत. परत जायचे होते पण कालपासून एसटीचा संप आहे. आता मिळेल त्या वाहनाने गावी जाणार असल्याचे एका महिलेने देशदूतला सांगितले. बर्‍याच वेळेपासून बसची वाट बघत आहे. परंतु, एकही बस आली नाही. इथे कुणी माहिती देणारेदेखील नाही. काय करावे काही कळत नाही. आता घरी परत चाललो आहे. बघू संप मिटेल तेव्हा जाऊ गावाकडे. असे सांगत एका देवळा तालुक्यातील आजोबांनी परत जाण्यात धन्यता मांडली.

रिक्षासह, खासगी वाहने रस्त्यावर

बस (Bus) बंद असल्याने ठिकठिकाणी प्रवासी मिळतील या आशेने अनेक चारचाकी वाहने रस्त्यावर अतिरिक्त भाडे आकारून आज प्रवाशांना सोडताना दिसून आले. यामध्ये मालेगावचे भाडे दोनशे ते अडीचशे रुपये आकारले जात होते. तर बस बंद असलेल्या कमी अंतराच्या मार्गांवर रिक्षाही धावताना दिसून आल्या. यामध्ये एरव्ही 40 रुपयांत पिंपळगाव बसवंतला पोहोचणार्‍या अनेकांनी दुप्पट पैसे देऊन पिंपळगावपर्यंतचा प्रवास केला.

द्वारका चौक गजबजला

नाशिकहून मुंबईकडे जाणार्‍या प्रवाशांची द्वारका चौकात एकच गर्दी झाली होती. मिळेल त्या वाहनाने प्रवाशांनी मुंबईकडे कूच केली. दुसरीकडे, काळी-पिवळी गाड्यांची याठिकाणी मोठी गर्दी होती. इगतपुरी, कसारा पर्यंत जाण्यासाठी तीनशे-तीनशे रुपये तर मुंबईपर्यंत जाण्यासाठी हजार रुपये भाडे यावेळी आकारले जात होते. दुसरीकडे, मालेगावपासून नाशिकला येण्यासाठी चक्क अठराशे एका रिक्षाचालकाने घेतले. यात तीन प्रवाशी होते. यामुळे नाशिकहून मालेगावला येण्यासती चक्क प्रतिप्रवासी सहाशे रुपये मोजावे लागल्याचे चित्र दिसून आले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com