शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य 'एसीबी'च्या जाळ्यात

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य 'एसीबी'च्या जाळ्यात

सिन्नर । वार्ताहर Sinnar

येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण ( ITI) संस्थेचे सचिव तथा प्राचार्यास 30 हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

नीलेश बबन ठाकूर (40)( Nilesh Baban Thakur ), रा. फ्लॅट नंबर 14, हरे कृष्णा अपार्टमेंट, स्वामी समर्थ नगर, आडगाव शिवार, नाशिक असे प्राचार्याचे नाव आहे. भ्रष्टाचार मुक्त राष्ट्रासाठी लाचलुचपत विभागाकडून जनजागृती सप्ताहाचे आयोजन केले जाते. हा सप्ताह सुरु असतानाच शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य लाच घेताना सापडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

ठाकूर हे संस्था व्यवस्थापन समितीद्वारा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सचिव तथा प्राचार्यपदावर कार्यरत असून तक्रारदार यांनी संस्थेच्या इमारतीचे ब्रिक बॅट कोबा व वॉटरप्रूफिंगचे काम ई-निविदेद्वारे घेतले होते. सदरील कामाची मंजूर केलेली रक्कम रुपये 11 लाख 51 हजार 298 मंजूर केल्याच्या मोबदल्यात प्राचार्य ठाकूर यांनी दि. 21 ऑक्टोबर 2022 रोजी तक्रारदाराकडे तीन टक्के रकमेची मागणी केली होती. तडजोडीअंती 30 हजार रुपये देण्याचे ठरले.

यासंदर्भात संबंधित तक्रारदाराने यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक एन. एस. न्याहळदे, पोलीस उपाधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संदीप घुगे, हवालदार एकनाथ बाविस्कर, जितेश जाधव यांच्या पथकाने सापळा रचून प्राचार्य ठाकूर यांस रंगेहाथ पकडले. याप्रकरणी ठाकूर यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 चे कलम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com