Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिकच्या स्वयंमला पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार

नाशिकच्या स्वयंमला पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्ह्यातील स्वयंम पाटील (Swayam Patil) याने क्रीडा प्रकारातील स्विमिंगमध्ये (Swimming) उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या कामगिरीबद्दल आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या हस्ते प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2022 (Prime Minister’s National Children’s Award 2022) देवून त्यास गौरविण्यात आले.

- Advertisement -

आज जिल्हाधिकारी कार्यालयात दूरदृष्यप्रणालीद्वारे आयोजित प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2022 वितरण कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी (Union Minister for Women and Child Development Smriti Irani) उपस्थित होत्या.

यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे (Collector Suraj Mandhare), उपायुक्त महिला व बालविकास चंद्रशेखर पगारे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अजय फडोळ, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी गणेश कानवडे, पर्यविक्षा अधिकारी प्रभाकर गावित, पुरस्कार प्राप्त स्वयंम पाटील यांची आई विद्या पाटील व वडील विलास पाटील आदी उपस्थित होते.

शैक्षणिक क्षेत्र, क्रीडा, कला आणि संस्कृती, शौर्य, समाजसेवा आणि नवतंत्रज्ञान अशा सहा क्षेत्रात अनन्य साधारण कामगिरी करणार्‍या बालकांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान करण्यात येतात. देशातील 29 मुलांना आज प्रातिनिधिक स्वरूपात दूरदृश्यप्रणालीद्वारे या पुरस्काराचे वितरण करण्यात आले आहे.

याअंतर्गत जिल्ह्यातील स्वयंम पाटील या 14 वर्षीय मुलाने एलिफंट गुफा ते गेट वे ऑफ इंडिया हे 14 किलोमीटर अंतर 4 तास 9 मिनिटांत पोहून पार केल्याचा विक्रम स्वयंम पाटीलने केला आहे. याची दखल घेत केंद्र सरकारने त्यास क्रीडा क्षेत्रातील प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2022 देवून सन्मानीत केले.

यावर्षी प्रथमच कानपूर आयआयटीमार्फत ब्लॉकचेन माध्यमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भ्रमणध्वनीवर डिजिटल प्रमाणपत्र व एक लाख रूपये रोख रक्कम पुरस्कार प्राप्त स्वयंम पाटील यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत. स्वयंम पाटील यास यापूर्वी देखील लिमका बुक ऑफ रेकॉर्ड 2017, दिव्यांगजन सशक्तिकरण हेतू राष्ट्रीय पुरस्कार 2018, वंडर बुक ऑफ इंटरनॅशनल रेकॉर्ड 2018, जिल्हा क्रीडा पुरस्कार 2020 तसेच वर्ल्डस् रेकॉर्ड इंडिया अशा पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

दूरदृष्यप्रणालीद्वारे झालेल्या पुरस्कार वितरण कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी स्वयंम पाटील व त्याचे आई वडील यांचा सत्कार करून अभिनंदन केले. पुढील ध्येयाबाबत बोलताना पॅराऑलिम्पिक, स्पेशल ऑलिम्पिकमध्ये आणि इंग्लिश खाडी पोहून पदक मिळविणार असल्याचे सांगितले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या शुभेच्छा

प्रधानमंत्री राष्ट्रीय बालपुरस्कार विजेत्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. भारतीय प्रजासत्ताकच्या 72 व्या वर्धापनदिन सोहळ्याच्या पार्श्वभुमीवर हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. जळगाव येथील शिवांगी काळे हिने ‘वीरता’ या श्रेणीमध्ये, पुण्याच्या जुई केसकर हिने ‘नव संशोधन’मध्ये आणि मुंबईतील जिया राय तसेच नाशिकच्या स्वयंम पाटील याने ‘क्रीडा’ श्रेणीमध्ये प्रधानमंत्री राष्ट्रीय बालपुरस्कार पटकावला आहे.

स्वयमच्या कार्याची दखल घेत त्याला पुरस्कार मिळाला ही बाब नाशिककरांंसाठी अभिमानाची आहे. त्याने आजपर्यंत मिळविलेले यश अतिशय वाखाणण्याजोगे आहे. त्याचे अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी खूप शुभेच्छा.

– छगन भुजबळ, पालकमंत्री, नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या