
पुणे । प्रतिनिधी Pune
लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा 'लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार' यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे. आज(दि.1 ऑगस्ट) पुण्यात मोदी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्कार प्रदान कार्यक्रमाच्या निमिताने पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकाच व्यासपीठावर येणार आहेत. राज्यातील राजकारणाच्या बदलत्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही सर्व मंडळी एकाच व्यासपीठावर येणार असल्याने राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे.
लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टतर्फे पंतप्रधान मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येईल. त्या कार्यक्रमासाठी शरद पवार प्रमुख पाहुणे असतील. स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर मंगळवारी (दि.1) सकाळी साडेअकरा वाजता हा कार्यक्रम होईल. लोकमान्य पुरस्कार सोहळानिमित्त मोदी-पवार तब्बल साडेआठ वर्षांनंतर एकाच मंचावर येत आहेत. याआधी हे दोन्ही नेते 14 फेब्रुवारी 2015 रोजी बारामती येथे झालेल्या कार्यक्रमात एकत्र आले होते. यानंतर तब्बल साडेआठ वर्षांनी असा योग जुळून आला आहे. यात आणखी एक विशेष भाग म्हणजे, राष्ट्रवादीत बंड केलेले आणि शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार हे सुद्धा पहिल्यांदाच एका जाहीर कार्यक्रमात एकाच मंचावर येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कार्यक्रमाला उपस्थित असतील, तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित राहणार आहेत.पंतप्रधानांचे मंगळवारी सकाळी पुण्यात आगमन झाल्यानंतर ते सकाळी 11 वाजता दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शन घेतील. सकाळी 11.45 वाजता त्यांना 'लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार' प्रदान करण्यात येईल. त्यानंतर, दुपारी पंतप्रधान मोदी हे पुणे मेट्रो पहिल्या टप्याचे काम पूर्ण झालेल्या दोन मार्गिकांच्या सेवेचे लोकार्पण करतील.
'सर्वांसाठी घरे' उद्दिष्टपूर्तीचा भाग म्हणून प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पिंपरी चिंचवड महापालिकेद्वारे बांधण्यात आलेली 1280हून अधिक घरे, तसेच पुणे महापालिकेतर्फे याच योजनेअंतर्गत बांधलेली 2650हून अधिक घरेही पंतप्रधानांच्या हस्तांतरित करण्यात येणार आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौर्याच्या निमित्ताने एनडीए व इंडिया आघाडी दोघेही मंगळवारी आमनेसामने येणार आहेत. मणिपूरमधील घटनेच्या निषेधार्थ ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांकडून आंदोलन करण्यात येणार आहे. तर विरोधकांच्या या आंदोलनाला जशास तसे उत्तर देण्याचा निर्णय भाजपाने घेतला आहे.
शरद पवार यांनी शिष्टमंडळाची भेट नाकारली
पंतप्रधान मोदींच्या पुरस्कार प्रदान कार्यक्रमाला जाऊ नये म्हणून शरद पवार यांना थांबवण्याचा प्रयत्न केला जात आहे. बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ शरद पवारांना भेटणार होते. काँग्रेस, आप, ठाकरे, पवार गटाचे नेते शिष्टमंडळामध्ये उपस्थित राहणार होते. पुण्यातील शरद पवारांच्या मोदीबागेतील घरी शिष्टमंडळ भेट घेणार होते. मात्र ही भेट नाकारण्यात आल्याचे समोर आले आहे. पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमाला जाण्यावर शरद पवार ठाम असून त्यांनी या शिष्टमंडळाची भेट नाकारली आहे.
एनडीए - इंडिया आघाडी आमने सामने
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौर्याच्या निमित्ताने एनडीए व इंडिया आघाडी दोघेही मंगळवारी आमनेसामने येणार आहेत. मणिपूरमधील घटनेच्या निषेधार्थ ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांकडून आंदोलन करण्यात येणार आहे. तर विरोधकांच्या या आंदोलनाला जशास तसे उत्तर देण्याचा निर्णय भाजपाने घेतला आहे.