Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यालोकशाही मंदिराचा आज महासोहळा

लोकशाही मंदिराचा आज महासोहळा

नवी दिल्ली । वृत्तसंस्था New Delhi

नव्या संसदेचे आज (दि.28)पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे.यावेळी विधिवत पूजा आणि होमहवनहोणार आहे. तामिळनाडूतील 20 आणि वाराणसीतील 12 पंडितांकडून ही विधिवत पूजा केली जाणार आहे. सकाळी साडेसात वाजता होमहवनाला सुरुवात होणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला आणि राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश पूजेला बसतील. त्यानंतर वैदिक पद्धतीने लोकसभेमध्ये राजदंड विराजमान केला जाईल.

- Advertisement -

दरम्यान,दिल्ली पोलिसांच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , नव्या संसदेभोवती चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. 70 पोलिस तैनात करण्यात आलेत. एसीपी दर्जाचे अधिकारी सीसीटीव्हीच्या माध्यमातून संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवून आहेत.

पंतप्रधानांकडे सेंगोल सुपूर्द

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी अधिनम बंधूंची भेट घेतली. यावेळी अधिनम संतांनी पंतप्रधानांकडे ऐतिहासिक सेंगोल सुपूर्द केला. हा सेंगोल तामिळ परंपरेनुसार रविवारी भारताच्या नव्या संसद भवनामध्ये स्थापित करण्यात येईल. 5 फूट लांब आणि आणि 800 ग्रॅम वजनाचा हा सेंगोल न्यायाचे प्रतीक आहे. तामिळ परंपरेमध्ये सेंगोलचा अर्थ संपदेने संपन्न असा होतो. त्याच्या शीर्षस्थानी नंदीची प्रतीमा आहे.

असा असेल उद्घाटन सोहळा

सकाळी 7:30 ते 8:30 हवन व पूजा

सकाळी 8:30 ते 9:00:लोकसभेत राजदंडाची स्थापना

सकाळी 9:00 ते 9:30 पंडित, सांधूसंतांच्या उपस्थितीत प्रार्थनासभा

दुपारी 12:00 वाजता:राष्ट्रगीतानंतर दुसर्‍या टप्प्यातील कार्यक्रम

दोन लघुचित्रपट दखवले जाणार

राष्ट्रपती, उपराष्ट्रपतींच्या संदेशांचे वाचन.

राज्यसभेतील विरोधी पक्षनेत्यांचे भाषण

लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला संबोधीत करणार

पंतप्रधान मोदी भाषण करतील.

75 रुपयांच्या नाण्याचे अनावरण

केंद्रीय अर्थ मंत्रालयानेही नव्या संसद भवनाच्या उद्घाटनप्रसंगी 75 रुपयांचे नाणे जारी करण्याची घोषणा केली आहे. 75 रुपयांचे हे नाणे गोलाकार असेल आणि त्याचे क्षेत्रफळ 44 मिमी असेल. या नाण्याच्या बाजूला 200 शिळे बनवण्यात आले आहेत. हे नाणे 50 टक्के चांदी, 40 टक्के तांबे, 5 टक्के निकेल आणि 5 टक्के जस्त मिसळून तयार केले जाणार आहे. नाण्यावर सत्यमेव जयते लिहिलेले असेल तसेच अशोकस्तंभही नाण्यावर कोरण्यात येईल. नाण्याच्या डाव्या बाजूला देवनागरी भाषेत भारत आणि इंग्रजीत इंडिया लिहिलेले असेल. त्याचप्रमाणे नाण्याच्या वरच्या बाजूला देवनागरी भाषेत संसद भवन लिहिलेले असेल आणि त्याचवेळी त्याच्या खाली नव्या संसद भवन संकुलाचे चित्र छापले जाईल.

कोणाला विश्वासात न घेताच सर्व निर्णय घ्यायचे असतील, तर विरोधी पक्षातील काही ज्येष्ठ सहकार्‍यांनी आपण संसदेच्या उद्घाटनाला जाऊ नये अशी भूमिका मांडली. त्या भूमिकेला माझा पाठिंबा आहे.

शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

संसद भवन हे लोकशाहीचे पवित्र मंदिर आहे. या मंदिरात देशाच्या जनतेला न्याय देणारे कायदे केले जातात. त्यामुळे अशा पवित्र मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कार टाकणे हा लोकशाहीचा अपमान आहे.

एकनाथ शिंदे ,मुख्यमंत्री

- Advertisment -

ताज्या बातम्या