Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशआज कठोर निर्णय होणार : राज्य मंत्रिमंडळाची बैठक, पंतप्रधानांची उच्चस्तरीय बैठक

आज कठोर निर्णय होणार : राज्य मंत्रिमंडळाची बैठक, पंतप्रधानांची उच्चस्तरीय बैठक

मुंबई:

देशात व राज्यात वाढणाऱ्या कोरोनामुळे आज मोठ्या हालचाली सुरु झाल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उच्चस्तरीय बैठक बोलवली आहे. दुसरीकडे राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. त्यात कोरोनाच्या आटकावसाठी कठोर निर्णय होण्याची शक्यता आहे. आज रविवार असूनही मुख्यमंत्र्यांनी ही बैठक बोलावल्याने त्या बैठकीत मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यता येत आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत मुंबईसह राज्याबाबत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेण्यात येणार आहे. आज संध्याकाळीच याबाबतची नवी गाईडलाईन जारी करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यात लॉकडाऊन लागू होणार की कठोर निर्बंध जाहीर होणार? याकडे संपूर्ण राज्यातील जनतेचं लक्ष लागलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी ३ वाजता मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. दूरदृश्यप्रणालीद्वारे ही मिटिंग होणार आहे.

महाराष्ट्रासह देशातील ८ राज्यांमध्ये करोनाने थैमान घातलं असून, विषाणू संक्रमण प्रचंड वेगानं वाढलं आहे. मागील तीन दिवसांपासून देशात ८० ते ९० हजारांच्या सरासरीनं रुग्ण आढळून आल्यानं चिंतेत भर पडली आहे. अचानक रुग्णसंख्येचा विस्फोट झाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय अधिकाऱ्यांची तातडीने उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत लसीकरणाच्या मुद्द्यासह करोना संक्रमण रोखण्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

मोदींनी बोलवली बैठक

करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीला केंद्रीय सचिव, पंतप्रधानांचे प्रधान सचिव, केंद्रीय आरोग्य सचिव यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित असणार आहे. डॉ. विनोद पॉल हे सुद्धा या बैठकीत सहभागी होणार आहेत. महाराष्ट्रासह देशातील आठ राज्यांमध्ये करोना झपाट्याने वाढू लागला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीप्रमाणे महाराष्ट्र, कर्नाटक, छत्तीसगढ, दिल्ली, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, पंजाब आणि मध्य प्रदेशात करोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. देशात आढळून आलेल्या एकूण रुग्णसंख्येपैकी या आठ राज्यातील रुग्णांची संख्या ८१.४२ टक्के इतकी आहे. तर सर्वाधिक रुग्णासंख्या असलेल्या देशातील पहिल्या दहा जिल्ह्यांमध्ये पुणे, मुंबई, नागपूर, ठाणे, नाशिक, बंगळुरू, औरंगाबाद, दिल्ली, अहमदनगर आणि नांदेड या जिल्ह्यांचा समावेश आहे. दहा जिल्ह्यांपैकी ९ जिल्हे हे महाराष्ट्रातील असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या