Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्यादसरा-दिवाळीला झेंडू खाणार भाव?

दसरा-दिवाळीला झेंडू खाणार भाव?

नाशिक । विजय गिते Nashik

जिल्ह्यात या मोसमात सरासरीपेक्षाही अधिक झालेला पाऊस, परतीच्या पावसाचेही वाढते प्रमाण, सतत पडणारा पाऊस, त्यातच करोनाचे सावट, यामुळे सण-उत्सवांवर मर्यादा आल्या आहेत.

- Advertisement -

परिणामी, जिल्ह्यात यावर्षी झेंडूची लागवड अत्यंत कमी प्रमाणात झालेली आहे. त्यामुळे नवरात्र, दसरा आणि दिवाळीच्या मोसमात झेंडूची फुले चांगलाच भाव खाणार! असा अंदाज वर्तवला जात आहे.

मागील सहा महिन्यांपासून राज्यभरातील मंदिरे बंद आहेत. त्यामुळे सध्या मागणीअभावी शेतकर्‍यांना झेंडू मातीमोल दराने विकावा लागत आहे. जिल्ह्यात तब्बल चार ते पाच हजार एकरवर झेंडूची लागवड होते. शेतकरी दसरा-दिवाळीचा हंगाम पाहून झेंडूची लागवड मोठ्या प्रमाणात करतात. काही शेतकर्‍यांकडे तर झेंडूचे बारमाही पीकही घेतले जाते. मात्र, यावर्षी करोनामुळे झेंडू विकला जाईल की नाही? याबाबत झेंडूउत्पादक शेतकर्‍यांना साशंकता होती.

त्यातच झेंडूच्या विक्रीबाबत कुठलाही अंदाज येत नसल्यामुळे यावर्षी अनेक शेतकर्‍यांनी झेंडू लागवडीला फाटा दिलेला आहे तर काही शेतकर्‍यांनी आंतरपीक म्हणून झेंडूच्या फुलांची लागवड केलेली आहे. अशाप्रकारे एकाच जमिनीवर दोन पिके घेऊन खर्चाचा ताळमेळ बसविण्याचा प्रयत्न शेतकर्‍यांनी यावर्षी केल्याचे दिसून येत आहे.

सध्या मंदिरे पूर्णतः बंद असल्यामुळे झेंडूलाही अत्यंत कमी मागणी आहे. झेंडूला मागणी नसल्यामुळे शेतकर्‍यांवर अत्यंत कमी किमतीत आपला झेंडू विकण्याची वेळ आली आहे. मुंबई बाजारामध्ये तर झेंडूच्या फुलांना अवघा दहा रुपये किलो असा अत्यंत कमी भाव मिळत असल्याने अल्प दरात शेतकर्‍यांना झेंडूची फुले विकावी लागत आहे. नाशिक बाजारपेठेत 20 ते 30 रुपये किलोपर्यंत झेंडूला दर मिळत असल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले. नुकत्याच झालेल्या गणेशोत्सवाच्या काळात मात्र झेंडूचे दर थोड्या प्रमाणात वाढलेले दिसून आले.

यावर्षी गणेशोत्सवामध्ये झेंडूच्या फुलांना शंभर ते दोनशे रुपयांपर्यंत भाव मिळाला.मात्र गणेशोत्सव संपताच झेंडू उत्पादकांना पाच ते दहा रुपयांपर्यंत किलो दराने झेंडूची फुले विकण्याची वेळ आली आहे. यामुळे झेंडू उत्पादकांना खर्चही निघणार नाही, अशी अवस्था झालेली आहे. पंधरा दिवसांपूर्वी तर काही शेतकर्‍यांनी झेंडूला भाव नसल्यामुळे आपली झेंडूची फुले फेकून दिल्याच्या घटनाही घडलेल्या आहेत.

झेंडूची लागवड करताना 60 ते 70 हजार रुपये इतका खर्च येतो. अशाप्रकारे मोठ्या प्रमाणात झेंडू लागवडीवर खर्च करून शेतकरी उत्पादन घेत असतात मात्र, सध्या झेंडूला अत्यल्प भाव असल्याने खर्चही निघेल अशी परिस्थिती नाही.त्यातच आता नवरात्र ही सुरू झाला आहे. नवरात्रौत्सवात झेंडूच्या फुलांना अतिशय मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यामुळे या नवरात्रोत्सवात झेंडूच्या फुलांचे पैसे घेऊन दोन पैसे हातात येतील.असा अंदाज शेतकर्‍यांना असून तशी अपेक्षाही झेंडू उत्पादक शेतकर्‍यांनी ठेवली आहे.

करोनाचा प्रादुर्भावामुळे झेंडूच्या फुलांच्या विक्री बाबत संभ्रम असल्यानेे यावर्षी झेंडूची लागवड अत्यल्प झालेले आहे. अनेक शेतकर्‍यांनी द्राक्ष बागांमध्ये झेंडूचे आंतरपीक म्हणून लागवड केलेली आहे. या झेंडूला दसर्‍याबरोबरच दिवाळीमध्येही भाव मिळेल, अशी अपेक्षा आहे.

-किशोर कदम, शेतकरी

- Advertisment -

ताज्या बातम्या