Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्यासायबर गुन्हे रोखणे मोठे आव्हानच!

सायबर गुन्हे रोखणे मोठे आव्हानच!

नाशिक । फारुक पठाण Nashik

शहरात एकीकडे घरफोडी, चोर्‍या, वाहन चोरीच्या घटना वाढत असतांनाच ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. मागील दोन महिन्यात नाशिक शहर सायबर क्राईम पोलीस दलाकडे एकूण सुमारे सात तक्रारी दाखल झाल्या आहेत. विशेष करून महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांना सायबर गुन्हेगार लक्ष्य करीत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, नागरिकांनी दक्ष राहून आपले ओटीपी कोणत्याही अनोळखी व्यक्तीस शेअर करू नये, असे आवाहन नवनियुक्त सायबर क्राईमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सिताराम कोल्हे यांनी केले आहे.

- Advertisement -

मागील काही दिवसांपासून नाशिक शहर परिसरातील सामान्य नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने आर्थिक गंडा घालण्याचे प्रकार वाढले आहेत. यामध्ये विशेष करून महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांना गुन्हेगार लक्ष्य करीत असल्यामुळे तसेच मोबाईल क्रमांकावरून फसवणूक होत असल्यामुळे पोलिसांसमोर देखील हे कडवे आवाहन ठरत आहे.

नुकताच एक वेगळाच प्रकार सायबर गुन्हेगारी वरून समोर आला आहे. एका महिलेने फेसबुक पेजवरकेलेले लाईक तब्बल पाच लाख रुपयाला पडल्याचे समोर आले होते. याबाबत नाशिक शहर सायबर पोलिसांनी विशेष कौशल्य दाखवत काही रक्कम हस्तगत करून एकाला राज्यातून ताब्यात घेतले. सविता अविनाश पवार (रा. नाशिक) यांनी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यांचा कॉस्मेटीक प्रोडक्टस तयार करण्याचा घरगुती व्यवसाय आहे. त्यांनी फेसबुक वरील व्यापार इन्फो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या फेसबुक पेजला लाईक केले होते. त्यानंतर त्यांना मोबाईल वरून तसेच मेसेज करून सतत संपर्क साधण्यात येऊन तुम्ही पैसे भरा त्यामुळे तुमच्या व्यवसायाची वृद्धी होईल, असे सांगण्यात आले होते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

पवार यांना वेळोवेळी पैसे भरण्यास लावुन एकुण 5 लाख 13 हजार 200 रूपयांची फसवणूक केली होती. त्याचप्रमाणे वीज वितरण कंपनीच्या नावाने एका महिलेची दोन लाखापेक्षा जास्त रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. सबा कौसर मोहम्मद वसिम शेख (वय 35, रा. दीप रेसिडेन्सी, अशोका मार्ग, हॅपी होम कॉलनी, नाशिक) यांची फसवणूक झाली असून त्यांनी सायबर पोलीस विभागात फिर्याद दाखल केली आहे. वीज बिल भरण्याचा बनाव करून शेख यांना अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगून त्याद्वारे पासवर्ड मिळवून त्यांची 2 लाख 13 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक झाली.

शहरातील एका नामांकित डॉक्टरांची देखील अशाच ऑनलाईन पद्धतीने सुमारे चार लाख रुपयाची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला होता. अशा घटनांमध्ये सतत वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सामान्य नागरिकांना मेसेज किंवा कॉल आल्यावर ते तिथून मिळत असलेल्या निर्देशानुसार कधी कधी फसवणुकीत अडकून जातात. दरम्यान, नागरिकांनी देखील सतर्क राहण्याची गरज असल्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

दोन महिन्यात सात गुन्हे

शहरात मागील सुमारे दोन महिन्यांच्या कालावधीत सायबर भामट्यांनी वेगवेगळ्या नागरिकांना गंडा घातला असून अशा वेगवेगळ्या प्रकरणात सायबर फसवणुकीचे सात गुन्हे दाखल झाले आहेत. सायबर गुन्हेगारांनी नाशिक शहरातील वेगवेगळ्या नागरिकांना 20 लाखांहून अधिक रकमेचा गंडा घातला असून अशा वेगवेगळ्या प्रकरणात सायबर फसवणूक झाल्याचे गुन्हे दाखल झाले आहे.

आमिषाचेच नागरिक बळी

सायबर भामट्यांनी दाखविलेल्या आमिषाला नागरिक बळी पडतात. यात उच्चशिक्षित आणि प्रतिष्ठित नागरिकांचाही समावेश आहे. तो मोहाचा क्षण ओळखून सावधगिरीने स्वतःचा बचाव करणे आवश्यक आहे. अनोळखी व्यक्तीला वैयक्तिक माहिती देणे टाळायला हवे.तसेच अनोळखी व्यक्तीने पाठवलेल्या लिंकवरून कोणतेही अ‍ॅप इन्स्टॉल न करता, रिप्लाय न करता स्वतःची आर्थिक फसवणूक टाळता येईल, असे पोलीस सतत आवाहन करतात तरी गुन्हे वाढत असल्याचे दिसत आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

जनजागृती करू

नागरिकांनी जागृत राहण्याची गरज आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने मेसेजेस, कॉल किंवा लिंक येत असतात. हे फेक मेसेजेस असतात त्यामुळे नागरिकांनी अशा फेक मेसेजला उत्तर देऊ नये. कोणत्याही परिस्थितीत आपल्याला मिळालेला ओटीपी क्रमांक अनोळखी व्यक्तीशी शेअर करू नये, जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही.

– डॉ. सिताराम कोल्हे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर गुन्हे शाखा, नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या