राष्ट्रपती मुर्मू यांचा आज शपथविधी

संसद भवनात सोहळा; 21 तोफांची सलामी देणार
राष्ट्रपती मुर्मू यांचा आज शपथविधी

नवी दिल्ली । वृत्तसंस्था New Delhi

नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Newly elected President Draupadi Murmu)आज सोमवारी (दि.25) देशाच्या सर्वोच्च संवैधानिकपदाची शपथ घेणार आहेत. शपथविधीनंतर ( swearing-in ceremony) राष्ट्रपती मुर्मू यांना 21 तोफांची सलामी दिली जाणार आहे. आज सकाळी 10.15 वाता संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात शपथविधी सोहळा होणार आहे. देशाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रामण्णा मुर्मू यांना राष्ट्रपतीपदाची शपथ देतील. शपथविधीनंतर राष्ट्रपती मुर्मू यांचे अभिभाषण होईल.

शपथविधी सोहळ्याआधी मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू एका औपचारिक मिरवणुकीने संसदेत दाखल होतील. उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्य, राज्यपाल, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, राजनैतिक मिशनचे प्रमुख, खासदार, केंद्र सरकारचे नागरी आणि लष्करी अधिकारी, प्रमुख नागरिक समारंभात सहभागी होतील.

शपथविधी सोहळ्यानंतर राष्ट्रपती मुर्मू राष्ट्रपती भवनाकडे रवाना होतील. तेथे त्यांना इंटर-सर्व्हिस गार्डकडून गार्ड ऑफ ऑनर देण्यात येईल. 64 वर्षीय द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा पराभव करून नवा इतिहास रचला. भारताच्या पहिला आदिवासी राष्ट्रपती होण्याचा सन्मान मुर्मू यांना मिळाला आहे.

भारताच्या 15 व्या राष्ट्रपतीपदासाठी झालेल्या निवडणुकीत 64 टक्क्यांहून जास्त वैध मते मुर्मू यांनी मिळवली. मुर्मू यांना 6,76,803 तर सिन्हा यांना 3,80,177 मते मिळाली. देशाच्या सर्वोच्चपदी विराजमान होणार्‍या मुर्मू सर्वात कमी वयाच्या राष्ट्रपती ठरणार आहेत. राष्ट्रपतीपदी विराजमान होणार्‍या त्या दुसर्‍या महिला आहेत. याआधी प्रतिभाताई पाटील यांनी देशाचे सर्वोच्चपद भूषवले आहे.

ओडिशाच्या रहिवासी

द्रौपदी मुर्मू यांनी झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून पद भूषवले आहे. 2015 ते 2021 दरम्यान त्या राज्यपालपदावर कार्यरत होत्या. मूळच्या त्या मयूरभंज, ओडिशा येथील रहिवासी आहेत. ओडिशातील बीजेडी सरकारमध्येही त्या मंत्री होत्या.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com