
नाशिक । प्रतिनिधी Nashik
भारतीय संस्कृतीचे रक्षण करणे ही आपल्यावर जबाबदारी असून ती प्रत्येकाने पार पाडली पाहिजे. सामाजिक प्रतिष्ठेचे मानदंड बदलले पाहिजे, असे प्रतिपादन लाचप्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी आज येथे केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संंघाच्या संपर्क विभागातर्फे नवरात्रोत्सवाच्या पावन पर्वात समाजाच्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणार्या भगिनींचा नवदुर्गा सन्मान सोहळा आज डॉ. कुर्तकोटी सभागृहात वालावलकर यांच्या हस्ते व विवेकच्या संपादक अश्विनी मयेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. त्यावेळी त्या बोलत होत्या. संघाचे विभागसंघचालक कैलास साळुंके यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. दैे. 'देशदूत'च्या संपादक डॉ.वैशाली बालाजीवाले यांच्यासह 14 महिलांचा यावेळी यथोचित सन्मान करण्यात आला.
वालावलकर पुढे म्हणाल्या की, हा संघाचा स्तुत्य उपक्रम असून मी देखील सत्कारमूर्तींकडून प्रेरणा घेतली. प्रत्येकीत एक गोष्ट आहे, ती आहे चिकाटी आणि आपल्या कामावर फोकस करण्याची वृत्ती. यातून ती घडल्याने तिच्या क्षेत्रात ती अग्रस्थानी येऊन पोहोचली आहे. सावित्रीबाई फुलेंंमुळे आज आपण करू शकलो. स्वतः ला सिद्ध करू शकतो. जिला पुढे जायचे आहे तिला साथ मिळत आहेत. संधी मिळाली की सोने करता येते. मात्र संधी मी काहीतरी करून दाखवले पाहिजे. चुरस करता आली पाहिजे. त्यातून कर्तृत्व सिद्ध करता येते.असे त्या म्हणाल्या.
अश्विनी मयेकर म्हणाल्या की, घराघरात संवाद कमी होत चालला आहे. पालक आणि मुले यातील संवाद हरवला आहे. प्रत्येक गोष्टीचे इव्हेंंट केले जात आहे. त्यातील मूळ गाभा विसरून चाललो आहोत. त्यामुळे आई- वडील होणे, पालकत्व स्वीकारणे महत्वाचे आहे. मुलांवर कळत, नकळत संस्कार घालणे ही काळाची गरज आहे. जबाबदारीने पालकत्व निभावण्याची गरज आहे, ती केवळ आईची नसून कुटुंबातील वडीलधार्यांची आहे. मकरंद धर्माधिकारी यांनी पद्य सादर केले. सुरेश गायधनी यांनी सत्कारमूर्तींचा परिचय करून दिला.
यावेळी नाशिक शहर संघचालक विजय कदम, सहसंघचालक डॉ. विजय मालपाठक, साहेबराव पाटील, सुहास वैद्य, विवेक सराफ, प्रकाश जोशी, मिलिंद खांदवे, अनिल दहिया, समृद्ध मोगल, सुनिश मोहळे, डॉ. प्रीती कुलकर्णी आदीसह अनेक माान्यवर उपस्थित होते.
...तेव्हा खरा सन्मान ठरेल
बदल संस्कारातून घडतात. आम्ही नेटाने काम करत आहोत. दिशा योग्य असल्याची जाणीव या पुरस्काराने करुन िेदली आहे. या पुरस्काराने आणखी जबाबदारी वाढली आहे. समाजातील प्रत्येक जण सज्जनतेकडे वाटचाल करतील, तेव्हा हा खरा सन्मान ठरेल.
- डॉ. वैशाली बालाजीवाले, दै.'देशदूत' संपादक
या नारीशक्तींचा सन्मान
देशदूतच्या संपादक डॉ. वैशाली बालाजीवाले, पूजा खैरनार (आर्किटेक्ट, गोल्ड मेडलिस्ट), अनिता जोशी (हस्तलिखित संरक्षक), पल्लवी पटवर्धन (अभिनेत्री), जयंती विश्वनाथन (वि. एस. एम. एनजीओ), जुही पेठे (वैज्ञानिक), माधवी साळवे (महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाच्या पहिल्या बस चालक), अश्विनी देवरे (आयर्नमॅन पुरस्कार विजेत्या), श्रुती देव (अभिनेत्री), भाग्यश्री शिर्के (उद्योजिका), मनिषा धात्रक (उद्योजिका), माधुरी कांगणे (अप्पर पोलीस अधीक्षक), डॉ. श्रिया देवचके (त्र्यंबकेश्वर नगर परिषद सीईओ), सुनंदा पाटील (जिल्हा क्रीडा अधिकारी)