जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी; शेतकरी सुखावले, पिकांना जीवदान

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी; शेतकरी सुखावले, पिकांना जीवदान

नाशिक / निफाड | प्रतिनिधी | Nashik / Niphad

नाशिक जिल्ह्यात आज सायंकाळी पाचच्या सुमारास विजांच्या कडकडाटांसह जोरदार पाऊस कोसळला. निफाड तालुक्यातही पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे. मुसळधार पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. अवघ्या काही मिनिटांमध्ये रस्ते व शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले दिसून आले.

गेल्या काही दिवसांपासून वातावरणात उकाडा जाणवत होता. मात्र, पाऊस हुलकावणी देत होता. शुक्रवारी सकाळपासूनच पाऊस येण्याचा अंदाज होता. दुपारनंतर मात्र उकाड्यात अधिकच वाढ झाली होती. अखेर सायंकाळी पाचच्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावली.

निफाडला शुक्रवारचा आठवडे बाजार असल्याने भाजीपाला विक्रेते, व्यावसायिक व नागरीकांची एकच तारांबळ उडाली. अनेक दिवसांपासून गोदाकाठ भागात दडी मारलेल्या पावसाने मागील आठवडाभरात रिमझिम पडायला सुरुवात झाली होती. तर शुक्रवारी सायंकाळी पावसाने दमदार हजेरी लावत चांगलीच बॅटिंग केली असल्याने शेतकरी राजाच्या चेहऱ्यावर एकच आनंद पहायला मिळत आहे.

दरम्यान, निफाड तालुक्यातील वनसगाव, उगाव, कुंदेवाडी, रौळस, पिंपरी, कारसूळ, लोणवाडी, दावचवाडी, पिंपळगाव बसवंत, पालखेड मिरची आदी गावांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे.

गोदाकाठ भागातही जोरदार

म्हाळसाकोरे | वार्ताहर

मान्सून सुरू होऊन जवळपास तीन महिन्याहून अधिक काळ उलटून गेल्यानंतरही निफाडच्या दक्षिण भागातील गोदाकाठावर पावसाची अवकृपा होती. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांच्या डोक्यावर चिंतेचे ढग वाहत होते. शेतकऱ्यांसमोर जनावरांचा चारा पिण्याचे पाणी तसेच शेतात पेरलेली सोयाबीन मका व इतर पिके डोळ्यासमोर पाण्यावाचून वाळून जात असल्याने चिंतेत नेहमी वाढ होत होती. तर काही शेतकऱ्यांनी दुबार पेरणीदेखील केली होती. शुक्रवारी रात्री करंजगाव, भेंडाळी, भुसे, चापडगाव, मांजरगाव, म्हाळसाकोरे, खानगाव थडी, तारुखेडले आदी गावांमध्ये दमदार सरी बरसल्या. त्यामुळे तूर्तास माना टाकलेली पिके, जनावरांच्या पाणी व चार्याचा प्रश्न सुटणार आहे.

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com