Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याश्रावणात त्र्यंबकेश्वर येथे प्रशासनाची सज्जता

श्रावणात त्र्यंबकेश्वर येथे प्रशासनाची सज्जता

नाशिक । प्रतिनिधी Nashik

श्रावण महिन्यात ( Shravan Month) सोमवार ( Shravan Somvar) या दिवसाला एक वेगळेच महत्व असते. या दिवसात नाशिकमधील त्र्यंबकेश्वर ( Trimbakeshwar ) येथील ज्योतिर्लिंग देवस्थान येथे प्रत्येक सोमवारी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. याचाच विचार करून पहाटे चार वाजताच मंदिर उघडण्यात येणार असल्याची माहिती त्र्यंबकेश्वर संस्थानने दिली आहे. त्यासोबतच नाशिकहून दर दोन मिनिटाला बसेसचे नियोजन करण्यात आलेले आहे.

- Advertisement -

देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे देशभरातून भाविक येत असतात. त्याच प्रकारे या ठिकाणी श्रावण महिन्यात देखील मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असते. हीच गर्दी लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने नियोजन केलेलं असून त्याबाबत त्र्यंबकेश्वर संस्थांसोबत बैठका घेऊन तहसीलदार, प्रांताधिकारी यांनी नियमावली बनवली आहे.

यंदा 15 ऑगस्ट रोजी तिसरा श्रावणी सोमवार येत असल्याने भाविकांची गर्दी उसळण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने फेरी मार्गावर आरोग्य सुविधा आणि पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून, गर्दी नियोजनासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.

दर्शनात कोणत्याही प्रकारचे अडथळे येऊ नये, यासाठी विश्वस्त मंडळाच्या वतीने विशेष काळजी घेण्यात येत आहे. यावर्षी 1 ऑगस्टला पहिला, 8 ऑगस्टला दुसरा, तर 15 ऑगस्ट रोजी तिसरा श्रावणी सोमवार आहे. 15 ऑगस्टला सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता गृहीत धरूनच प्रशासनाने बंदोबस्ताचे नियोजन केले आहे.

या फेरीसाठी राज्यभरातील भाविक मोठ्या संख्येने त्र्यंबकेश्वरकडे रवाना होत असतात. त्यांच्यासाठी विशेष बस सोडल्या जाणार आहेत, तसेच परिक्रमेसाठी राज्य परिवहन महामंडळ, महावितरण, पोलिस विभाग त्र्यंबकेश्वर नगरपालिका, वैद्यकीय पथक यांची सज्जता असून अधिकारी कर्मचार्‍यांच्या ड्युटीचे नियोजन करण्यात आले आहे. दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर यंदा त्र्यंबकेश्वरच्या फेरीचा आनंद भाविकांना घेता येणार आहे.

सिटीलिंक कडून जादा बसेस

भाविकांसाठी 10 जादा बसेस सोडण्याचा निर्णय सिटीलिंक प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला आहे. त्यामुळे यंदा श्रावणात त्र्यंबकेश्वर याठिकाणी देखील भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी सिटीलिंकच्या वतीने पहिल्या, दुसर्‍या व चौथ्या सोमवारी दररोजच्या 22 बसेस व्यतिरिक्त 10 जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या