नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक शहरात करोनामुक्त झालेल्या रुग्णांचा शरीरात तयार झालेल्या अँटीबॉडीज तपासणी करण्यासाठी नाशिक महापालिकेच्या वतीने आता सिरो सर्व्हे करण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर औरंगाबाद येथील शासकीय मेडिकल कॉलेजचे तांत्रिक तज्ज्ञ डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी नुकतीच महापालिकेत येऊन वैद्यकीय आरोग्य विभागाकडून माहिती घेतली. दरम्यान मनपा क्षेत्रातील करोनावर मात केलेल्या अडीच हजार नागरिकांच्या चाचण्या केल्या जाणार आहे.

नाशिक महानगरपालिका क्षेत्रात केल्या जाणार्या सिरो सर्व्हेकरिता मनपाने औरंगाबाद मेडिकल कॉलेजमार्फत तांत्रिक तज्ज्ञांची मदत मागितली होती. यास सकारात्मक प्रतिसाद देत या शासकीय मेडिकल कॉलेजकडून प्रख्यात आहारतज्ज्ञ डॉ. जगन्नाथ दीक्षित यांची निवड करण्यात आली होती. यानुसार डॉ. दीक्षित यांनी महापालिकेत येऊन आयुक्त कैलास जाधव व वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांची भेट घेत येथील करोना स्थितीची माहिती घेतली. यानंतर आता सिरो सर्व्हे अंतर्गत केल्या जाणार्या अडीच हजार चाचण्या या वैद्यकीय अधिकार्यांसह एकूण चार जणांचे एक पथक अशा 40 पथकांद्वारे केल्या जाणार आहेत. या पथकांना डॉ. दीक्षित लवकर मार्गदर्शन करण्यासाठी लवकरच पुन्हा नाशिकला येणार आहे.

नाशिक महानगरपालिका प्रशासनाकडून सिरो सर्व्हेची तयारी केली जात आहे. महापालिका क्षेत्रात आत्तापर्यंत 71 हजारांवर करोनाबाधित आढळून आले असून 965 बाधितांचा मृत्यू झाला आहे. शहरात 68 हजारांच्यावर करोनाबाधित बरे होऊन घरी पोहोचले आहे. तसेच सध्या उपचार घेत असलेल्या बाधितांचा आकडा 1 हजार 345 इतका आहे. शहरात प्रतिदिन करोनाबाधितांच्या आकड्यात घट झाली आहे. तसेच मृतांच्या टक्केवारीत घट झाली आहे. आता शहरात विविध भागातील नागरिकांनी करोनावर मात केली असून त्यांच्या शरीरात हार्ड युमिनीटी तयार झाली का? तसेच अँटीबॉडी तयार झाल्या का? याकरिता शासनाच्या निर्देशानुसार शहरात सिरो सर्व्हे केला जाणार आहे.

याकरिता शहरातील करोना हॉटस्पॉट भाग असलेल्या पंचवटीतील काही झोपडपट्टी, जुने नाशिक, काही वसाहती, ज्या भागात कमी करोना रुग्ण समोर आले असा भाग अशा भागातील सुमारे अडीच हजार करोनावर मात केलेल्या नागरिकांच्या अँटीबॉडी चाचण्या केल्या जाणार आहे. याकरिता अशा नागरिकांचे रक्ताचे नमुने घेऊन लॅबमार्फत ही तपासणी केली जाणार आहे. यातूनच शहरातील विविध भागांत करोनावर मात केलेल्या नागरिकांच्या शरीरात हार्ड युमिनीटी तयार झाली का? तसेच अँटीबॉडी तयार झाल्या का? याची माहिती जमा केली जाणार आहे. यानंतर भविष्यात करोना साथीवर मात करण्यासाठी उपचार व इतर व्यवस्था केली जाणार आहे.