मनपाची सिंहस्थासाठीच्या रिंग रोडसाठी तयारी पूर्ण…

jalgaon-digital
2 Min Read

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

सिंहस्थ काळामध्ये नाशिक शहरातील वाहतूकीवर पडणारा ताण लक्षात घेऊन शहराच्या अंतर्गत बाह्य व बायपास रिंगरोड उभारणीचे नियोजन करण्याचे काम गतीमान झाले असून लवकरच शिखर समितीचे गठण झाल्यानंतर त्याच्या समोर मंजूरीसाठी ठेवण्यात येणार असल्याचे नगररचना (urban planning) संचालक हर्षल बाविस्कर यांनी सांगितले.

नाशिक येथे होणारा कुंभमेळा (Kumbh Mela) हा राज्य, देशासह आंतरराष्ट्रीय स्तरावर भाविकांच्या श्रद्धेचे स्थान आहे त्यासाठी शहरात येणाऱ्या गर्दीचे नियोजन नियंत्रण करण्याच्या दृष्टीने नाशिक महानगरपालिकेची (Nashik Municipal Corporation) प्राथमिक माहिती संकलनाचे काम सुरू करण्यात आले आहे. स्वतःकडे अस्तित्वात असलेल्या सेवा सुविधांचा वर्गीकरण करून त्यातील त्रुटींचा अभ्यास करण्यासोबतच नवीन विकासाची संधी बाबत माहिती संकलित केली जात आहे.

प्रत्यक्षात सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीची दिशाही वेगवेगळ्या तीन पातळीवर करावी लागणार आहे. त्यासाठी मनपा आयुक्तांनी मध्यंतरी पत्र लिहून मुख्यमंत्र्यांच्या (Chief Minister) अध्यक्षतेखाली शिखर समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव राज्य शासनासमोर ठेवला आहे.

सिंहस्थासाठी आवश्यक असणाऱ्या बाबींची पूर्तता करण्यासोबतच विकास कामे त्यासाठी लागणारा निधी व कालावधी याबाबतचा सविस्तर प्रकल्प अहवाल राज्याची शिखर समिती स्थापन झाल्यानंतर सादर केला जाणार असल्याचे बाविस्कर यांनी सांगितले.

सिंहस्थांच्या शाही स्नानासाठी देशभरातून संत महंत विविध आखाड्यांचे प्रमुख आपल्या साधकांसह शहरात दाखल होत असतात. येणाऱ्या संत महंतांसाठी सर्वप्रथम साधूग्रामची जागा उपलब्ध करण्याचा प्रस्ताव असून त्यासाठी 4 हजार 500 कोटी रुपयांची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे.

शहरात येणाऱ्या वाहनांना सुरळीतपणे बाहेर पडता यावं यासाठी बाह्य रिंग रोड प्रस्तावित आहे. या रिंग रोड साठी जागा अधिग्रहित करताना त्यांना त्याचा मोबदल्यात टीडीआर देणे अथवा जागा विकत घेणे याबाबतही राज्य शासनाकडे मार्गदर्शन मागविले जाणार आहे.

शहराच्या अंतर्गत रस्त्यांमध्ये अंतर्गत, मध्य व बाह्य रिंग रोड अशा तीन स्तरावर रिंग रोड बनवले जाणार आहेत त्यांच्या परस्परांना जोडणाऱ्या ‘मिसिंग लींक’ जोडण्याच्या कामाचे नियोजन ही मोठे आहे.

सुमारे 120 किलोमीटरचा हा अंतर्गत, मध्य व बाह्य रिंग रोड (Ring Road) भूसंपादनासाठी अथवा विस्तारीकरणासाठी सुमारे एक हजार कोटी रुपये खर्च येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नाशिक महानगरपालिकेच्या अत्याधिक असलेल्या छोट्या रस्त्याचे फुलविड्थ रस्त्यांमधे विस्तारिकरण करावे लागणार आहेत. त्यामुळे सिंहस्थ काळात शहरात येणाऱ्या भाविकांना वाहतूक कोंडीचा फटका न बसता सुरक्षितपणे ते शहराच्या बाहेर पडू शकतील.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *