गणेश विसर्जनाची तयारी पूर्ण

jalgaon-digital
3 Min Read

नाशिक | प्रतिनिधी Nashik

गणेशमूर्ती विसर्जनासाठी ( Ganesh Idol immersion ) मनपा प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी नाशिक शहरातील सर्व सहा विभागांत तयारीचा आढावा घेतला. उद्या सकाळी 10.30 वाजता आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांच्या उपस्थितीत पूर्व विभागीय कार्यालय, नाशिक मनपाच्या मानाच्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे.

मनपाचे सर्व अधिकारी, सेवक यांनी सकाळी 10.30 वाजेपर्यंत चौक मंडई येथील वाकडी बारव, फाळके रोड येथे मानाच्या गणपतीच्या मिरवणुकीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन मनपा कर्मचारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष आणि शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांनी केले आहे.

शहरातील विसर्जन मिरवणूक कामकाजाची देखरेख, नियंत्रण आणि पर्यवेक्षण कार्यवाहीसाठी सहा अधिकार्‍यांकडे जबाबदारी देण्यात आली आहे.उपायुक्त मनोज घोडे-पाटील यांच्याकडे नवीन नाशिक, मुख्य लेखा परीक्षक बोधिकिरण सोनकांबळे पूर्व विभाग, उपायुक्त अर्चना तांबे सातपूर, उपायुक्त करुणा डहाळे पश्चिम, उपायुक्त डॉ दिलीप मेनकर नाशिक रोड आणि उपायुक्त विजयकुमार मुंढे यांच्याकडे पंचवटी विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. नाशिक मनपाकडून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम राबवण्यात आले आहेत.

या उपक्रमाचा एक भाग म्हणून शहरातील नदीपात्राचे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. सातपूर विभागातील गणपती विसर्जन ठिकाणांची पाहणी आज उपायुक्त अर्चना तांबे यांनी केली. विभागीय अधिकारी, बांधकाम आणि विद्युत विभागाचे अभियंता यावेळी उपस्थित होते. उपायुक्त करुणा डहाळे यांनी पश्चिम विभागात विसर्जन मार्गाची पाहणी करून सूचना केल्या. उपायुक्त डॉ. दिलीप मेनकर यांनी नाशिकरोड विभागातील दसक घाटची पाहणी करून तयारीचा आढावा घेतला. पूर्व विभागाचे विभागीय अधिकारी नितीन नेर यांनीही आज कृत्रिम विसर्जन स्थळांची पाहणी केली.

पोलीस प्रशासन सज्ज

गणेश भक्तांसह पोलीस प्रशासनही गणरायाला निरोप देण्यासाठी सज्ज झाले आहे. मिरवणुकीदरम्यान काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस व्हिडिओ चित्रीकरणातूनही मिरवणुकीवर लक्ष ठेवणार आहेत. नाशिक मनपाने सहाही विभागांत गणपती विसर्जनाची व्यवस्था केली असून प्रत्येक ठिकाणी पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला आहे. तीन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी परिसरात खबरदारीचा उपाय म्हणून जीवरक्षक तैनात करण्यात आले आहेत. नाशिक शहरातील मुख्य मिरवणुकीसाठी 22 मंडळांनी सहभाग घेतला असून सकाळी साडेदहा वाजता मिरवणुकीचा आरंभ होणार आहे.

4 उपायुक्त, 40 पोलीस निरीक्षक

पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत चार उपायुक्त, सात सहाय्यक आयुक्त,40 पोलीस निरीक्षक,125 सहाय्यक पोलीस निरीक्षक,उपनिरीक्षक,1400 पोलीस अंमलदार 1050 होमगार्ड व राज्य राखीव दलाची एक तुकडी असा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

71 विसर्जन स्थळे

नाशिक मनपाने पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने शहरातील नदीपात्राचे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धनासाठी प्रयत्न सुरू आहेत. गणेश मूर्तींचे नदीपात्रात विसर्जन न करता पालिकेने ठरवून दिलेल्या ठिकाणीच विसर्जन करता येणार आहे. एकूण 71 नैसर्गिक आणि कृत्रिम विसर्जन स्थळांची निवड करण्यात आली आहे. मनपा सेवक, स्वयंसेवक गणेश विसर्जन स्थळांवर गणेश मूर्ती आणि निर्माल्य संकलनासाठी सज्ज राहणार आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *