Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यापोलीस प्रशासनाकडून निर्बंध अंमलबजावणीची तयारी

पोलीस प्रशासनाकडून निर्बंध अंमलबजावणीची तयारी

नाशिक । प्रतिनिधी

मंंत्री मंडळाच्या बैठकीत करोना निर्बंध अधिक कडक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अद्याप त्याचे आदेश प्राप्त झाले नसले तरी शहर तसेच ग्रामिण पोलीस प्रशासनाने कालपासूनच शासनाच्या आदेश अंमलबजावणीची तयारी सुरू केली आहे. दरम्यान सोमवारी याची रंगीत तालीम शहरातील बाजारपेंठांमध्ये होणार आहे.

- Advertisement -

शहरातील गर्दी होणार्‍या प्रमुख सात ठिकाणांना पोलिसांनी निर्बंध लावले असून, पास घेतल्याशिवाय या ठिकाणी नागरिकांना प्रवेश करता येणार नाही. सोमवारपासून (दि.5) या निर्णयाची ठोस अंमलबजावणी होणार आहे. वाहतूक आणि गर्दी नियंत्रण हे महत्त्वाचे लक्ष पोलिसांनी ठेवले असून, त्यादृष्टीने पोलिस आणि महापालिका प्रशासनाने तयारी केली आहे.

बाजारपेठेतील गर्दी करोनावाढीस हातभार लावत असून, गर्दीला नियंत्रण केल्याशिवाय करोनाची घोडदौड थांबणे शक्य नाही. लॉकडाऊन हा पर्याय सरकारने लांब ठेवल्याने गर्दी नियंत्रणासाठी पोलिस प्रशासनाने ग्राहकांची नोंद घेऊन पास देण्याचा मार्ग अवलंबला आहे. सुरूवातीस यासाठी पाच रुपये शुल्क आकारण्यात आले. मात्र, याबाबत ओरड सुरू झाली. तसेच पैसे संकलित करताना गर्दीचा गराडाही वाढला.

यापार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी फ्री पास देण्याचा आणि महापालिकेच्या मदतीने त्या भागाची नाकाबंदी करण्याचा निर्णय घेतला. पवननगरसारख्या ठिकाणी वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. शहरात मेनरोड, सीटीसेंटर मॉल, बाजारसमिती, सिडको, नाशिकरोड, इंदिरानगरचे कलानगर भाजी मार्केट आणि सातपूरच्या अशोकनगर अशा सात ठिकाणी या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.

मेनरोड परिसर बॅरकेडींग करून पूर्णत: नियंत्रणात आणण्यात आला असून, येथील वाहतूकही वळवण्याबाबतचे आदेश काढण्यात येणार आहे. सोमवारी सकाळपासून पासेस देऊन ग्राहकांना मार्केटमध्ये सोडण्यात येईल. संबंधित ग्राहक एक तासाच्या आता मार्केटमधून बाहेर पडला नाही तर त्याला किमान पाचशे रुपये दंड भरावा लागणार आहे.

यापूर्वी गल्ली बोळांचा आधार घेऊन नागरिक प्रशासनाला चकावा देण्यात यशस्वी ठरत होते. आता मात्र बॅरकेडींग आणि ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात राहणार असल्याने ही मात्रा चालणार नाही, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली. तर शासनाने कडक निर्बंर्धांचे आदेश पारीत केल्यास त्याच्या अंमलबजावणीची ही रंगीत तालिम असल्याचे माणले जात आहे.

आदेश मिळताच कार्यवाही

रविवारी दुपारी मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत लॉकडाऊन न करता गर्दी नियंत्रणासाठी निर्बंध अधिक कडक करण्याची घोषणा करण्यात आली आहे. याचा प्राथमिक अंदाज आला असून आमची यंत्रणा सज्ज असणार आहे. शासनाचे आदेश मिळताच याची कडक अंमलबजावणी सुरू करण्यात येणार आहे.

दिपक पांडे, पोलीस आयुक्त

- Advertisment -

ताज्या बातम्या