आज ईद-ए-मिलाद; शहरात सजावट, घरोघरी फातेहा

जुने नाशिक | प्रतिनिधी | Old Nashik

पवित्र ईद-ए-मिलाद अर्थात पैगंबर जयंतीची तयारी शहरातील मुस्लिम बांधवांनी पूर्ण केली आहे. ईदनिमित्त (eid) शहरात ठिकठिकाणी आकर्षक सजावट करण्यात आली आहे. करोनाचे (corona) नियम शिथिल होऊन धार्मिकस्थळे खुली झाली असली तरी जुलूस मिरवणुकीला पोलीस प्रशासनाने परवानगी दिलेली नाही…

फक्त पाच वाहनानेच मिरवणूक मार्गावर जाऊन पवित्र बडी दर्गा शरीफचे दर्शन घ्यावे, अशी परवानगी मिळाली आहे. मुस्लिम बांधवांनी नियमांचे पालन करून सण साजरा करावा, असे आवाहन खतीब- ए-नाशिक हाफिज हिसामुद्दीन अशरफी यांनी केले आहे.

शहरातील जुने नाशिक तसेच मुस्लिम बहुल भागात मोठ्या प्रमाणात सजावट करण्यात आली आहे. ठिकठिकाणी हिरवे-लाल झेंडे लावण्यात येऊन भव्य कमानी उभारण्यात आल्या आहेत. शालिमार (shalimar), गंजमाळ (ganjmal) येथे भव्य देखावा तयार करण्यात आला आहे. सर्वत्र विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

ईद-ए-मिलाद हा मुस्लिम बांधवांचा सर्वात मोठा सण आहे. इस्लामी रब्बीउलनूर महिन्याच्या 12 तारखेला ईद-ए-मिलादचा सण साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने भरगच्च धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शहर परिसरातील मशिदी, दर्गा शरीफसह मुस्लिम बांधवांची घरे व दुकानांवर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

मुस्लिमबहुल भागातील चौक, गल्ली व परिसरात सजावट करण्यात आली आहे. लायटिंग झुंबर, फोर कलर झेंडे, मदिना शरीफ, बगदाद शरीफ, अजमेर शरीफ, माहरारा शरीफ, बरेली शरीफ, कचोछा शरीफ, ताजोद्दीन बाबा नागपूर शरीफ, बडी दर्गा शरीफसह विविध धार्मिक स्थळांचे रंगीत फोटो असलेले फलक, फुगे, झेंडे लावण्यात आले आहे.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *